Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

डॉ. पायल आत्महत्या: आरोपी तिन्ही डॉक्टर निलंबित

Spread the love

डॉक्टर पायल तडवीचं रॅगिंग करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या नायर रुग्णालयातील तीन कनिष्ठ डॉक्टरांवर कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स अर्थात ‘मार्ड’ने या तिघींचंही सदस्यत्व निलंबित केलं आहे. दरम्यान, पायलच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी आज विविध संघटनांनी रुग्णालयाबाहेर निदर्शने केली तर महिला आयोगाने रुग्णालयाच्या अधिष्ठातांना नोटीस बजावून अहवाल मागितला आहे.

संबंधित विभागाच्या प्रमुखांनाही निलंबित करण्यात यावं, अशी मागणी ‘मार्ड’ने केली आहे. पायल तडवीने वरिष्ठ सहकाऱ्यांकडून होत असलेल्या त्रासाबद्दल तोंडी व लेखी तक्रार करूनही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही आणि एका उमद्या डॉक्टरचा जीव गेल्याचे ‘मार्ड’चे म्हणणे आहे. पायलने २२ मे रोजी आत्महत्या केली होती. पायलच्या आत्महत्येप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात २३ मे रोजी डॉ. हेमा आहुजा, भक्ती मेहर आणि अंकिता खंडेलवाल या तिघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणे, रॅगिंग व अट्रॉसिटी कायद्याखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डॉक्टरांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप आहे आणि त्या ग्रुपवर या तिन्ही डॉक्टर पायलला तिच्या जातीवरून हिणवायचे, असा आरोप पायलच्या कुटुंबीयांनी केला आहे. डॉ. पायलच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कारवाई करावी. त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी आज एसएफआय, डीवायएफआय, जनवादी महिला संघटना, जातीअंत संघर्ष समिती अशा विविध संघटनांनी एकत्र येत नायर रुग्णालयाबाहेर संतप्त निदर्शने केली आहे.

राज्य महिला आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेत नायर रुग्णालयाच्या अधिष्ठातांना नोटीस धाडली आहे. आपल्या रुग्णालयात व त्याच्याशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये रॅगिंगविरोधी कायद्याची अंमलबजावणी होते का?, असा प्रश्न या नोटिशीत विचारण्यात आला आहे. पायलच्या आत्महत्येमुळे विद्यार्थी व वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुसंवाद नसल्याचे स्पष्ट झाले असून याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी व रॅगिंगविरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कोणती पावले उचलणार आहात, याचा सविस्तर अहवाल येत्या ८ दिवसांत राज्य महिला आयोगाकडे सादर करावा, असेही नोटिशीत बजावण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!