Crime News Update : निलंबित पोलिसाने केला अनैतिक संबंधातून लघुउद्योजकाचा खून…
औरंगाबाद : लघु उद्योजकाच्या खून प्रकरणात निलंबित पोलिसाला अटक करण्यात आली आहे हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, वाळूजमधील साजापूर येथील लघु उद्योजक सचिन साहेबराव नरोडे (वय ३७) यांचा बंदुकीची गोळी झाडून केलेल्या खून प्रकरणात लाच प्रकरणात निलंबित असलेला पोलीस अंमलदार रामेश्वर सीताराम काळे व त्याचा साथीदार लक्ष्मण नामदेव जगताप यांना अटक करण्यात आली आहे
याप्रकरणी १८ मार्च रोजी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात निवृत्त शिक्षक साहेबराव फकीरराव नरोडे यांनी फिर्याद दिली होती. १७ मार्च रोजी रात्री सचिन नरोडे यांचा बालाजी नगरमधील राहत्या घराजवळ गोळी झाडून खून करण्यात आला होता. खुनाच्या तपासासाठी पोलिसांची गुन्हे शाखेतील पाच पथके व एमआयडीसी वाळूज पोलिसांची तीन, अशी मिळून आठ पथके स्थापन करण्यात आली होती. पाच दिवसांनंतर खुनाची नेमकी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. पत्रकार बैठकीला पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत स्वामी, सहायक आयुक्त महेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, कृष्णचंद्र शिंदे आदी उपस्थित होते.