Prakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते !! “
वंचितांची मुंबईची महासभा आणि ओवेसी -आंबेडकरांच्या भाषणाचा अर्थ
हा तर टक्कल पडलेल्यांना कंगवे विकण्याचा प्रयत्न आहे . तुमच्या आणि त्यांच्या प्रयत्नाने सत्ताबदल झाला तर त्यांच्या टकलावर केसही उगवतील आणि ते कंगवेही विकत घेतील. तूर्त मात्र टक्कल पडलेल्या विरोधकांच्या डोक्यावर सत्तारूपी केश रोपण करण्यासाठी तुम्हालाच पुढाकार घेण्याची गरज आहे. कारण सत्तेची आणि संविधानाची खरी गरज वंचित -बहुजनाना आहे . ७० वर्षे सत्तेची फळे चाखणारांना नाही. साधा प्रश्न आहे . भाजपसारख्या वर्तमानात बलाढ्य झालेल्या बाहुबलीला “एनडीए” ची गरज आहे . रात्र न दिवस शिव्यांची लाखोली वाहिलेल्या सेनेने , अफजलखान संबोधल्यावरही अमित शहा ” मातोश्री”च्या पायऱ्या चढतात, हे सत्तेचे राजकारण आहे . आणि खिशात राजीनामा घेऊन फिरणारे सेनेचे नेते पदोपदी अवमान करणाऱ्या भाजपशी जुळवून घेतात हे सत्तेचे राजकारण आहे . सत्ता गेल्यावर काय परिणाम होतात याची जाणीव झाल्याने उत्तर प्रदेशात ज्यांचे आपसात कधी जमत नाही ते ” मायावती आणि अखिलेश एकत्र येऊन जागा वाटप करतात , हे सत्तेचे राजकारण आहे . मग बलाढ्य भाजपशी दोन हात करून स्वबळावर आमची सत्ता कशी येणार ? हे आम्हाला कधी कळणार ? हा खरा प्रश्न आहे .
मुंबईच्या शिवतीर्थावर होत असलेल्या वंचित आघाडीच्या सभेकडे दोन अर्थाने बघितले जात होते
१. सभेच्या निमित्ताने होणारे शक्तिप्रदर्शन आणि
२. बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांचे मित्र बनलेल्या खा. असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून जाहीर होणाऱ्या भूमिका.
अर्थात या दोन्हीपैकी पहिली गोष्ट सगळ्या महाराष्ट्राने बघितली पण दुसऱ्या गोष्टीने या सभेकडे पाहणाऱ्यांचे समाधान झाले नाही . त्याचे कारण उघड आहे हे दोन्हीही नेते इतके सोपे नाहीत कि जे आपले पत्ते सहजपणे आपल्या प्रतिस्पर्ध्यांना दाखवतील. दोघेही मुरब्बी नेते आहेत. आपापल्या समाजात दोघांनाही अर्थातच मनाचे स्थान आहे .या सभेत अनेक समाज घटकांतून आलेल्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची समयोचित भाषणे झाली. त्यात माजी न्यायमूर्ती कोळसेपाटलांना फार वेळ मिळाला नसला तरी त्यांचा संदेश लोकांना समजला. बाकी आपल्या आघाडीत किन्नर दिशा पिंकी शेख यांना सन्मानाचे स्थान देण्याचा बाळासाहेबांचा निर्णय अर्थातच प्रशंसनीय आहे . या समाजाला कुठल्याही राजकीय पक्षाने इतके मनाचे स्थान दिलेले नाही . त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करायला हवे.
आपला मूळ मुद्दा बाळासाहेब आणि ओवेसी यांच्या भाषणातील अर्थाचा आहे .
प्रारंभी आपण खा. असदुद्दीन ओवेसी यांच्या भाषणाचा विचार करू .
खा. असदुद्दीन ओवेसी हे स्वतः बॅरिस्टर आणि लोकसभेतील अनुभवी खासदार आहेत. काही लोक त्यांना भारताचे आधुनिक जिना असेही म्हणतात. मुस्लिम समाजाचे जितके आक्रमक तितकेच संयमी नेते म्हणून ते देशात ओळखले जातात. काश्मीर प्रश्नापासून ते राम मंदिर-बाबरी मशीद आणि तीन तालाकच्या मुद्द्यापर्यंत ते सर्व प्रकारच्या मर्यादा सांभाळून बोलतात . विविध वृत्त वाहिन्यांवर त्यांना लोकांनी पाहिलेले आहे आणि ऐकलेलेही आहे . राजकारण आणि सामाजिक , आर्थिक विकासापासून वंचित मुस्लिम समाजच्या प्रतिनिधित्वाबद्दल ते आग्रही आहेत. त्यामुळेच ते मुस्लिम समाजाच्या तरुण वर्गात लोकप्रिय आहेत. म्हणूनच काँग्रेस-राष्ट्रवादीतील मुस्लिम नेत्यांपेक्षा त्यांचा वट वेगळा आहे .वर्तमान काळात सर्वाधिक ऐकलं जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे .खरे तर त्यांचे भाषण नेहमीप्रमाणेच झाले . यावेळी पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा विषय यावेळी नवीन होता अर्थात या विषयावर त्यांना जे बोलायला पाहिजे होते ते त्यांनी बोलून दाखवले . बोलण्याच्या बाबतीत ते निडर आहेत .
आम्ही भारतीय आहोत हे आम्हाला पाकिस्तानी लोकांनी सांगण्याची गरज नाही असे ते सातत्याने सांगतात . पाकिस्तानातही, त्यांनी “तुम्हाला आमच्या प्रश्नात नाक खुपसण्याची गरज नाही ” हे रोखठोकपणे सांगून भारताचे संविधान आणि न्यायव्यवस्थेची तारीफ केली होती तर पाकी न्याय्य व्यवस्थेची त्यांच्याच देशात खिल्ली उडविली होती . म्हणून त्यांच्या भारतीयत्वावर एखादा ढोंगी हिंदुत्ववादीच टीका करू शकतो किंवा त्यांना मुस्लिम धार्जिणे म्हणून शकतो. एखादी व्यक्ती स्वतःच्या समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात बोलत असेल तर त्या व्यक्तीला जातीयवादी म्हणणे म्हणजे
” हम आह भी करते है तो होते है बदनाम और वो कत्ल भी करते है तो तो चर्चा भी नही होती “
असेच म्हणावे लागेल .
आपल्या भाषणात त्यांनी आपला पक्ष महाराष्ट्रात लोकसभा लढविणार कि नाही ? लढल्यास किती जागी लढणार ? याविषयी त्यांनी काहीही भाष्य केले नाही. त्यांच्या भाषणाचा जोर “बाळासाहेब आंबेडकर हे एक धोरणी नेते असून त्यांच्याकडूनच मुस्लिम समाजाचा आणि वंचित समाजाचा विकास होईल” अशी हमी देत “बाळासाहेबांना पर्याय नसल्या“चे आग्रही प्रतिपादन केले . या विषयाचे महत्व समजून सांगताना त्यांनी लोकांच्या भावनेला हात घालीत “संविधानाचे रक्षण, आपली सर्वाधिक महत्वाची जबाबदारी असल्या”चे समजावून दिले .
बाळासाहेबांनी अतिशय शांतपणे विषयाला हात घालत…
भटके , विमुक्त आदिवासी , धनगर , ओबीसी , आगरी , कोळी , भंडारी , राजकारणापासून वंचित सर्वसामान्य मराठा यांना सत्तेत सहभागी सहभागी होण्याची गरज असल्याचे सांगून स्वातंत्र्याच्या ७० वर्षातही वंचितांना न्याय मिळाला नाही , तो कसा ? याची हकीकत अतिशय पोटतिडकीने सांगून शेवटी भाजप -सेना , काँग्रेस -राष्टवादी यांच्यावर चौफेर टीका करीत शेवटी सांगितले , कि आमची दोन -चार जागांची हि लढाई नाही . जागा वाटपाचा हा प्रश्नच नाही . आमची लढाई संविधानाच्या रक्षणाची आणि मनुवाद्यांच्या विरोधाची आहे .
भाजप स्वतःला “हार्ड हिंदुत्वादी” म्हणवितात तर काँग्रेस स्वतःला “सॉफ्ट हिंदुत्वादी” म्हणवून घेते . देशाच्या संविधानाला अशा वैदिक हिंदुत्वापासून धोका आहे. फुले शाहू आंबेडकरांची सामाजिक समतेची आणि सर्वांगीण विकासाची वाट सर्व वंचितांना संविधानाने दाखविलेली आहे . संविधानविरोधी संघ हा हक्क आणि अधिकार काढून घेण्यासाठी षडयंत्र करतो आहे म्हणून संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याचे राजकारण करण्याची गरज ते प्रतिपादन करतात . संघावर थेट बंदी आणावी असेे त्यांचे मत नाही. याबाबतीत काँग्रेसने स्पष्ट भूमिका घ्यावी असा त्यांचा कायम आग्रह आहे . आणि हि भूमिका घेऊन जर काँग्रेस येत असेल तर निवडणुकीच्या अखेरच्या दिवसापर्यंत वंचित आघाडीची दारे युतीसाठी उघडी असतील असा “प्रकाश” त्यांनी काँग्रेसला दाखवला आहे.
या दोन्हीही नेत्यांची भाषणे लक्षात घेता, धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये असे जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला वाटत असेल तर त्यांनीही त्यांच्या या मुद्द्यासंदर्भात भूमिका घेण्याची गरज आहे . विशेष म्हणजे राहुल गांधी स्वतःला जन्माने जाणवेधारी ब्राह्मण म्हणवून घेत असले तरी ते विचाराने बाळासाहेब आंबेडकरांच्या जवळचे आहेत . संघाला आणि संघाच्या विचारांना त्यांचाही तितकाच विरोध आहे जितका बाळासाहेबांचा आहे .प्रॉब्लेम आहे तो संवादाचा. कारण बाळासाहेबांची भाषा महाराष्ट्रातील नेत्यांना कळत यासाठी नाही कि , त्यांना संघ म्हणजे काय ? समजत नाही . शरद पवारांनी आता कुठे संघावर कुठे अभ्यास सुरु केला आहे . त्यांनी स्वतःच हे सांगितले आहे . म्हणून राष्ट्रवादीच्या लोकांना भिडे गुरुजींची शाळा नेमकी काय आहे? ते लक्षात येत नाही. विचारधारांचा फरक हा असा आहे . हा फरक जितक्या लवकर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या लक्षात येईल तितक्या लवकर वंचित आघाडी आणि महा आघाडीचा तिढा सुटणार आहे अन्यथा धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन अटळ आहे हे सांगण्यास कुणाही तज्ज्ञाची गरज नाही . कारण बाळासाहेब आपल्या मतांवर ठाम असतात .
राष्ट्रभाषेत हेच सांगायचे झाले तर …
” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते !! “
जसे “एमआयएम” ची दोस्ती , नजरेतून उतरलेले आणि पक्ष सोडून गेले नेते , कार्यकर्ते . मग आपल्याला कोणी अहंकारी म्हणो, दुराग्रही वा हट्टी म्हणो भाजपची ए -टिम, बी- टिम म्हणो, नाही तर कोणी स्तुती करो अथवा टीका !! ते फारशी काळजी करीत नाहीत. त्यांचा स्वभाव तसाच आहे . पटलं तर या नाही तर फुटा .. त्यांचे हे असे व्यक्तिमत्व समजून घेतले तरच ते कळतात अन्यथा नाही.
अर्थात त्यांच्या भाषणातून एक मात्र स्पष्ट झाले की टक्कल पडलेल्यांना कंगवे विकत घेण्याचा बाळासाहेबांचा एकूण आग्रह आहे. आपली लढाई विचारधारेची आहे असे ते म्हणतात, पण हि लढाई सत्तेच्या राजकारणातूनही ते करु शकतात. रस्त्यावरची लढाई तर ते आयुष्यभर लढतच आले आहेत. आणि तहहयात ती लढवीच लागणार आहे यात वाद नाही. वंचितांना सत्तेत घेऊन जाण्याच्या त्यांच्या विचारांबद्दल शंका नाही. पण बेरजेच्या राजकारणाशिवाय कोणालाही सत्तेत जाणे अशक्यप्राय आहे . आधी बेरीज आणि मग हवी तशी वजाबाकी हा गणिताचा सर्वसाधारण नियम आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचाही काॅंग्रेसला तत्वत: टोकाचा विरोध होता पण बाबासाहेबांनी त्याच काॅंग्रेसच्या मंत्रीमंडळात राहून संधीचे सोने केले आणि समाजाचा उद्धार केला हे बाळासाहेबांच्या लक्षात येत नसेल का? प्रश्न अनेकांना पडतो .
राजकारण हे सत्तेसाठीच करायचे असते , समाजकारणाच्या सामाजिक चळवळी कधीही करता येतात पण सत्तेचे राजकारण लोकशाहीत पाच वर्षातून एकदा करता येते . हा विषय मुळातून समजून घेण्याची गरज आहे. वंचित बहुजनांचे राजकारण केवळ “संघ केंद्रित” नव्हे तर “सत्ता केंद्रित” असणे काळाची गरज आहे हे निमित्ताने सांगावेसे वाटते .कारण मतांची किंमत तुमच्या पारड्यात अधिक आहे .
विश्लेषण अप्रतिम.सर्व सामान्य माणसाला सहज लक्ष्यात येइल अस…धन्यवाद बाबा जी.जय भिम
Thanks Dhammdeep . Keep in touch
खरच अप्रतिम विश्लेषण बाळासाहेब आंबेडकर यांची न समजणारी भाषा सोप्या शब्दात सांगितल्या बदल धन्यवाद
Thanks for your comment
दोन्ही नेत्यांच्या भाषणाचे विश्लेषण अतिशय सुरेख पध्दतीने मांडले आहे. आदरणीय बाळासाहेबांची अट काँग्रेस नी मान्य करून मतांचे विभाजन टाळावे.
Thanks Ashok being here & for your comment
Thanks for your comment
खूप अभ्यासपूर्ण आणि वास्तवाला हात घातला
सर्व सामान्य माणसाच्या मनातील घालमेलीला मोकळी वाट करून दिलीत
Thanks Sagar . Keep in touch
बाळासाहेब यशस्वी पणे डावपेच टाकत आहेत . याचा शेवट बाळासाहेबांना वाटाघाटीत जास्तीत जास्त जागा मिळो व वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त खासदार- आमदार होवोत . ……बातमी ची भट्टी भारी जमलीय
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद .
काँग्रेस पक्षाला माहिती आहे की, बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारांचा फटका काँग्रेसलाच बसणार आहे पण त्यांनीही जागा वाटपाची घेतलेली भूमिका ताठर आहे काँग्रेस मध्ये प्रस्थापित नेत्याचा अधिक भरणा आहे त्यामुळे बहुजन वंचीत आघाडीला 12 जागा काय आणि सहा काय कदापिही सोडणार नाही.
Thanks for Comment