आरक्षणातून गेल्या पाच वर्षात किती आय एफ एस, आय ए एस , आणि आय पी एस झाले ? लोकसभेत दिली माहिती ….
नवी दिल्ली : गेल्या ५ वर्षांत युपीएसीद्वारे आरक्षित आणि मागास वर्गामधून ११९५ उमेदवारांना आयएएस, आयपीएस आणि आयएफएस म्हणून संधी मिळाली असल्याची माहिती आज लोकसभेत देण्यात आली आहे. वर्षानिहाय आकडेवारी पाहायची झाल्यास २०१८ मध्ये २३३, २०१९ मध्ये २३१, २०२० मध्ये २२३, २०२१ मध्ये २५० आणि २०२२ मध्ये २५८ आरक्षित आणि ओबीसींमधील उमेदवार हे आयएसए, आयपीएस आणि आयएफएस अधिकारी बनले. दरम्यान, एससी, एसटी आणि ओबीसींमधील किती आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकारी सेवेमध्ये आहेत याचे उत्तर आज सरकारने संसदेमध्ये दिले आहे.
याबाबत केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ही माहिती सभागृहात दिली. त्यांनी सांगितले की भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) आणि भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) मधील पदांची भरती ही यूपीएससीच्या नियमांनुसार केली जाते. सध्याच्या नियमांनुसार यूपीएससी नागरी सेवेमध्ये अनुसूचित जातींना १५ टक्के, अनुसुचित जमातींना ७.५ टक्के आणि इतर मागासवर्गियांना २७ टक्के आरक्षणाची तरतूद आहे.
जितेंद्र सिंह यांनी माहिती देताना पुढे सांगितले की, २०१८ मध्ये ओबीसींमधून ५४ आयएएस, ४० आयपीएस आणि ४० आयएफएस अधिकारी बनले होते. याच वर्षी एससींमधून २९ आयएएस, २३ आयपीएस, आणि १६ आयएफएस अधिकारी बनले होते. तर एसटीमधून १४ आयएएस, ९ आयपीएस आणि ८ आयएफएस अधिकाऱ्यांची निवड झाली होती. तर २०१९ मध्ये १०३ आयएएस, ७५ आयपीएस आणि ५३ आयएफएस अधिकारी नियुक्त करण्यात आले होते.
२०२० मध्ये ९९ आयएस, ७४ आयपीएस, ५० आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली होती. २०२१ मध्ये एससी, एसटी आणि ओबीसींमधून ९७ आयएएस, ९९ आयपीएस आणि ५४ आयएफएस अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. २०२२ मध्ये या गटांमधून १०० आयएएस, ९४ आयपीएस आणि ६४ आयएफएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.