इराणमध्ये युद्धानंतर दडपशाही वाढली; २१ जणांना फाशी, ४,००० हून अधिक लोकांना अटक – UN अहवालात धक्कादायक खुलासा
इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात वाढलेल्या संघर्षानंतर मध्य पूर्वेत परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. संयुक्त राष्ट्र (UN) च्या ताज्या अहवालानुसार, युद्धानंतर इराणने आतापर्यंत २१ जणांना फाशी दिल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
फाशीमागील कारणे काय?
माध्यम अहवालानुसार, जानेवारी २०२६ मधील आंदोलनात सहभागी झालेल्या ९ जणांना मृत्युदंड देण्यात आला. १० जणांवर विरोधी गटांशी संबंध असल्याचा आरोप ठेवण्यात आला, तर २ जणांना गुप्तहेरगिरीच्या आरोपाखाली शिक्षा सुनावण्यात आली. इराण सरकारने ही कारवाई राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचा दावा केला असला, तरी मानवाधिकार संघटनांनी याला क्रूर दडपशाही म्हटले आहे.
४,००० पेक्षा अधिक लोक अटकेत
युद्ध सुरू झाल्यापासून ४,००० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. UNच्या अहवालात म्हटले आहे की, कैद्यांवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार केले जात असून, जबरदस्तीने कबुलीजबाब घेतले जात आहेत. अनेक कैदी बेपत्ता असल्याच्या तक्रारींमुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
UN मानवाधिकार प्रमुख वोल्कर तुर्क यांनी इराणच्या कारवाईवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी फाशीच्या शिक्षांवर तात्काळ स्थगिती देण्याची आणि मनमानी अटक केलेल्या लोकांना मुक्त करण्याची मागणी केली आहे. तसेच, न्यायप्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष असावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इराण-अमेरिका तणाव अधिक तीव्र
फेब्रुवारीअखेर अमेरिका आणि इस्रायल यांच्या संयुक्त कारवाईनंतर परिस्थिती आणखी बिघडली आहे. अमेरिका सातत्याने इराणला इशारे देत असताना, इराणने कोणत्याही शांतता चर्चेला नकार दिला आहे. त्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
चीननंतर सर्वाधिक फाशी देणाऱ्या देशांमध्ये इराणचा क्रमांक लागतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इराणची प्रतिमा आणखी खराब होत असून, मानवाधिकारांच्या मुद्द्यावर जागतिक दबाव वाढत आहे.
