Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नवी मुंबईत घरखरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो कुटुंबांसाठी आनंदाची बातमी : सिडकोच्या घरांच्या दरात 10% कपात

Spread the love

मुंबई किंवा नवी मुंबईत स्वतःचं हक्काचं घर असावं, हे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न आता अधिक सुलभ होणार आहे. नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या किमतीत थेट 10% कपात करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत याची अधिकृत घोषणा केली.

या निर्णयामुळे नवी मुंबई परिसरात घर घेण्यास इच्छुक असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवी मुंबई हे आधीपासूनच नियोजनबद्ध आणि स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाते. उत्तम रस्ते, शैक्षणिक व आरोग्य सुविधा, सार्वजनिक वाहतूक आणि नुकतेच सुरू झालेले आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे नवी मुंबई घरखरेदीसाठी आकर्षक पर्याय ठरत आहे.

सिडकोच्या दरात थेट 10 टक्के घट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, सिडकोने नवी मुंबईतील विविध प्रवर्गातील घरांसाठी निश्चित केलेल्या दरांमध्ये थेट 10% कपात करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे ही घरे आता पूर्वीपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होतील आणि सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यास मदत होईल.

17 हजार घरांची लॉटरी लवकरच

सिडकोतर्फे खारघर, वाशी, खारकोपर, तळोजा, उलवे, कळंबोली, कामोठे आणि पनवेल या भागांमध्ये सुमारे 17 हजार घरे बांधण्यात आली आहेत. या घरांसाठीची लॉटरी प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे. लॉटरीपूर्वीच दरकपातीचा निर्णय घेऊन नागरिकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.

EWS आणि LIG गटाला विशेष फायदा

विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) यांच्यासाठी या घरांच्या किमती 10 टक्क्यांनी कमी करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अत्यल्प व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात घर मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

सर्वांसाठी घरे’ संकल्पनेला बळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या निर्णयामुळे अधिकृत, सुरक्षित आणि दर्जेदार घरे सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवी मुंबईत घर घेण्याची तयारी करणाऱ्यांसाठी हा निर्णय मैलाचा ठरणार असून, घरखरेदीची वाट पाहणाऱ्या हजारो कुटुंबांसाठी आनंदाची बातमी ठरली आहे.

 

Secret Santa Gift Ideas | ₹1000 च्या आतली BEST Amazon खरेदी

आपलं सरकार

Click to listen highlighted text!