महाराष्ट्रातील महापालिका निवडणूक आचारसंहिता लागू : 29 शहरांत 15 जानेवारीला होणार मतदान, 16 ला निकाल…
महाराष्ट्रातील नगर निगम निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आज घेतलेल्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा केली. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) यांसह राज्यातील एकूण 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारी 2026 पूर्वी सर्व मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे बंधनकारक आहे. त्याच अनुषंगाने या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
अनेक वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांना अखेर मुहूर्त
राज्यातील 29 पैकी 27 महापालिकांची मुदत आधीच संपलेली आहे. काही महापालिकांची मुदत 2020 मध्ये, तर मुंबईसह 18 महापालिकांची मुदत 2022 मध्ये संपली होती. चार महापालिकांची मुदत 2023 मध्ये संपली होती. जालना आणि इचलकरंजी या दोन महापालिका नवनिर्वाचित असून त्यांचाही या प्रक्रियेत समावेश आहे.
मुंबईत एक सदस्यीय प्रभाग, इतर ठिकाणी बहुसदस्यीय व्यवस्था
मुंबई महापालिकेत एक सदस्यीय प्रभाग पद्धत लागू राहणार असून प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावे लागेल. उर्वरित 28 महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. बहुतेक महापालिकांमध्ये एका प्रभागातून 4 उमेदवार निवडून द्यावे लागतील. काही प्रभागांत 3, तर काही ठिकाणी 5 उमेदवार निवडले जाणार आहेत. त्यामुळे मतदारांना साधारणपणे 3 ते 5 मते द्यावी लागतील.
निवडणूक कार्यक्रम असा असेल
29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी
– नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत : 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025
– नामनिर्देशन छाननी : 31 डिसेंबर 2025
– उमेदवारी माघार : 2 जानेवारी 2026
– निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी : 3 जानेवारी 2026
– मतदान : 15 जानेवारी 2026
– मतमोजणी व निकाल : 16 जानेवारी 2026
कोणकोणत्या महापालिकांमध्ये निवडणूक होणार?
मुंबई महानगर प्रदेश (MMR)
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, भिवंडी, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, पनवेल
पश्चिम महाराष्ट्र
पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, इचलकरंजी
उत्तर महाराष्ट्र
नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, मालेगाव
मराठवाडा
छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना
विदर्भ
नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर
या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापणार असून, महापालिका निवडणुकांमुळे आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.
