मान्सून आला रे आला !! सायंकाळपर्यंत केरळमध्ये आगमन, २४ राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर देशात मान्सूनच्या आगमनासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक बनले असून मान्सून आज संध्याकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास केरळमध्ये दाखल होऊ शकतो. यंदा मान्सून २६ मे रोजीच केरळात पोहोचण्याचा अंदाज होता, मात्र नियोजित वेळेपेक्षा तो ९ दिवस उशिराने येत आहे. साधारणपणे १ जून रोजी मान्सून केरळात दाखल होतो आणि पुढील दीड महिन्यात संपूर्ण देश कव्हर करतो.
दरम्यान, केरळसह तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये पुढील ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
२४ राज्यांमध्ये अलर्ट; ‘क्यूम्युलोनिम्बस’ ढगांमुळे वादळी पावसाची शक्यता
देशातील २४ राज्यांमध्ये हवामान विभागाने पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह अलर्ट जारी केला आहे. सध्या राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये प्री-मान्सून ॲक्टिव्हिटी सुरू आहेत.
हवामानाचा पॉवरहाउस मानल्या जाणाऱ्या ‘क्यूम्युलोनिम्बस’ ढगांमुळे या भागात ५० ते ७० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात मात्र अद्यापही तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पार असून उन्हाचा चटका कायम आहे.
केरळमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’; ५ आणि ६ जूनचे हवामान कसे असेल?
केरळच्या अलप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यांसाठी आयएमडीने ३ तासांचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून येथे ११ ते २० सेमीपर्यंत मुसळधार पाऊस होऊ शकतो.
५ जून (शुक्रवार): राजस्थान, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओडिशात वादळी वाऱ्यांसह पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. जम्मू-काश्मीर, लद्दाख आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे.
६ जून (शनिवार): पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेशात ४०-५० किमी वेगाने वारे वाहतील. बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेशात पावसाची हजेरी राहील, तर पूर्वोत्तर राज्यांमध्ये (आसाम, मेघालय, अरुणाचल) वादळी पाऊस असेल.
