अभिजित दिपके यांच्या अमेरिकेतील शिक्षण खर्चावर प्रश्न; निधीच्या स्रोतांची चौकशी करण्याची मागणी; दिपके यांनी दिले स्पष्टीकरण
‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक आणि NEET पेपरफुटी आंदोलनामुळे चर्चेत आलेले अभिजित दिपके पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. यावेळी त्यांच्या अमेरिकेतील उच्च शिक्षणासाठी झालेला खर्च आणि पक्षाच्या आर्थिक स्रोतांबाबत चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
सुरत येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अमित तिवारी यांनी महाराष्ट्र सरकार, भारत निवडणूक आयोग आणि केंद्रीय जीएसटी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
त्यांच्या तक्रारीत, एमआयडीसीमधून कनिष्ठ अभियंता पदावरून निवृत्त झालेल्या दिपके यांच्या वडिलांचे मासिक उत्पन्न सुमारे ₹60 ते ₹65 हजार असताना अभिजित दिपके यांना अमेरिकेसारख्या महागड्या देशात उच्च शिक्षणासाठी कसे पाठविण्यात आले, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अभिजित दिपके यांचे स्पष्टीकरण
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अभिजित दिपके यांनी ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांना दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, बोस्टन विद्यापीठातील शिक्षणाचा मोठा खर्च शिष्यवृत्तीमधून (Scholarship) भागविण्यात आला, तर उर्वरित रक्कम शैक्षणिक कर्जाद्वारे (Education Loan) उभारण्यात आली. हे कर्ज अद्याप पूर्णपणे फेडायचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या निधीबाबतही स्पष्टीकरण
‘कॉकरोच जनता पार्टी’च्या निधीबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिपके यांनी सांगितले की, पक्षाचे काम क्राउडफंडिंग (Crowdfunding) आणि लोकसहभागातून मिळणाऱ्या देणग्यांवर चालणार आहे. पक्षाच्या प्रत्येक आर्थिक व्यवहाराचा पारदर्शक हिशोब ठेवला जाईल, असा दावा त्यांनी केला.
चौकशीची मागणी
दरम्यान, अमित तिवारी यांनी पक्षाची कायदेशीर नोंदणी, निधीचे स्रोत आणि आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी निवडणूक आयोग आणि केंद्रीय जीएसटी विभागाकडे केली आहे. या तक्रारीनंतर संबंधित यंत्रणांकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
सध्या या प्रकरणात चौकशीची मागणी करण्यात आली असून, संबंधित आरोपांबाबत कोणत्याही सरकारी यंत्रणेने अद्याप अंतिम निष्कर्ष जाहीर केलेला नाही.
