तीन मुलींना शिकवून मोठं केलं; अखेर वृद्धाश्रमातच वडिलांचा अंत, अंत्यसंस्कारालाही मुली आल्या नाहीत
आयुष्यभर कष्ट करून तीन मुलींना शिक्षण दिलं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं. मात्र वृद्धापकाळात त्याच मुलींनी वडिलांकडे पाठ फिरवल्याची हृदयद्रावक घटना हरियाणातील सोनीपत येथे समोर आली आहे. वृद्धाश्रमात वास्तव्यास असलेल्या शिवचरण गुप्ता यांचे निधन झाले. मात्र त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी किंवा अस्थी विसर्जनासाठीही तिन्ही मुलींपैकी एकीही उपस्थित राहिली नाही.
वृद्धाश्रमाच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवचरण गुप्ता यांची प्रकृती गेल्या काही महिन्यांपासून खालावत होती. सुमारे 20 दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीबाबत तिन्ही मुलींना माहिती देण्यात आली होती. मात्र विविध कारणे देत त्यांनी भेट देणे टाळल्याचा दावा करण्यात आला आहे.
व्यवसायात नुकसान, त्यानंतर वृद्धाश्रमाचा आधार
महाराष्ट्रात कापड व्यवसाय करणारे शिवचरण गुप्ता यांना व्यवसायात मोठे नुकसान झाल्यानंतर ते सोनीपत येथे स्थायिक झाले. सुमारे दीड वर्षांपूर्वी ते पत्नी मीना गुप्ता यांच्यासह वृद्धाश्रमात राहण्यासाठी आले होते. काही महिन्यांपूर्वी पत्नीचे निधन झाले. मुलगा नसलेल्या शिवचरण यांनी आपल्या तिन्ही मुलींना शिक्षण दिले होते. त्यापैकी दोघी शिक्षिका आहेत.
शेवटच्या क्षणापर्यंत मुलींची वाट पाहत राहिले
वृद्धाश्रम प्रशासनाच्या माहितीनुसार, आजारपण वाढल्यानंतरही शिवचरण गुप्ता मुलींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्याकडे मोबाईल फोनही होता. मात्र अखेरच्या काळात मुलींकडून संपर्क कमी झाला. मृत्यूपूर्वी मुलींची एकदा भेट व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही.
अंत्यसंस्कारासाठीही कोणी आले नाही
शिवचरण गुप्ता यांच्या निधनानंतर वृद्धाश्रम प्रशासनाने तिन्ही मुलींना संपर्क करून मृतदेह काही काळ ठेवण्याची तयारी दर्शवली. मात्र मुलींनी वेळ नसल्याचे सांगत येण्यास नकार दिल्याचे वृद्धाश्रमाने सांगितले.
यावेळी मोठ्या मुलीने ऑनलाइन ₹5,100 पाठवून अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. अंत्यसंस्कार व्हिडिओ कॉलद्वारे दाखवण्याची तसेच संपूर्ण प्रक्रिया रेकॉर्ड करून पाठवण्याची विनंतीही करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
अस्थी विसर्जनाची जबाबदारीही वृद्धाश्रमाने पार पाडली
माहितीनुसार, मोठी मुलगी नेपाळमध्ये, दुसरी उत्तर प्रदेशातील आझमगढ येथे तर धाकटी मुलगी मुंबईत राहते.
सुरुवातीला अस्थी जतन करून ठेवण्यास सांगण्यात आले होते. मात्र नंतर अस्थी घेण्यासाठीही कोणी येणार नसल्याचे कळवण्यात आले. त्यामुळे शिवचरण गुप्ता यांच्या अस्थींचे विसर्जनही वृद्धाश्रम प्रशासनानेच केले.
TET पेपरफुटी तपासात मोठा खुलासा; आता ‘SET’ परीक्षाही आरोपींच्या रडारवर असल्याचा संशय
