MumbaiNewsUpdate : महापरिनिर्वाण दिनी देशभरात डॉ. बाबासाहेबांना अभिवादन , चैत्यभूमीवर उसळला लाखोंचा जनसागर
मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज देशभरातच नव्हे तर जगभरातून आदरांजली अर्पण करण्यात येत आहे . विशेषतः त्यांना अभिवादन करण्यासाठी दर वर्षीप्रमाणे याही वर्षी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीत येऊन दाखल झाले आहेत. दरम्यानआज मुंबईच्या चैत्यभूमीवर जाऊन राज्यपाल , नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली आदरांजली अर्पण केली.
थोर समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भीमराव रामजी आंबेडकर यांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर ६ डिसेंबर हा दिवस भारतात महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबरपासून लाखो अनुयायी मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी परिसरात दाखल झाले आहेत. आज लाखो अनुयायी हे चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करून बाबासाहेबांचे दर्शन घेत आहेत.
दरम्यान महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांची आस्था आणि त्यांची संख्या लक्षात घेता त्यांची नीट व्यवस्था पाहिली जावी, त्यांची कुठेही कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच दिले होते . त्यानंतर याठिकाणी पालिका कर्मचाऱ्यांनी देखील चोख व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर करण्याचे निर्देशही शिंदे यांनी यावेळी दिले होते.
६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईतील दादरमधील चैत्यभूमीत त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर ६ डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून पाळला जाऊ लागला. यानिमित्ताने दरवर्षी लाखोंच्या संख्येने त्यांचे अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल होतात. काल, संध्याकाळपासूनच अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होऊ लागले आहेत.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरिता मुंबई महापालिकेने विविध सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. दादर चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’ यासह आवश्यक ठिकाणी अनुयायींची व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी महिलांसाठी स्वतंत्र असे पिंक टॉयलेट्स, हिरकणी कक्ष, सर्व अनुयायांना शुद्ध पेयजल पुरविण्यासाठी रिव्हर्स ऑसमॉसिस (आरओ) प्लांट, अतिरिक्त प्रसाधनगृह सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासोबतच संपूर्ण परिसरात स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षेच्या अनुषंगानेही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. शौचालयांच्या संख्येतही यंदा मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. रांगेतील अनुयायांसाठी, मुख्य रस्त्यांवर, इंदू मील परिसर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान याठिकाणी अतिरिक्त शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.
महिला अनुयायांच्या सुविधेसाठी पिंक टॉयलेट
संपूर्ण परिसरातील स्वच्छतेच्या व्यवस्थेसाठी प्रत्येक सत्रामध्ये २२० कामगार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील स्वच्छतेसाठी प्रत्येक सत्रामध्ये २२५ कामगार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यंदा महिला अनुयायांच्या सुविधेसाठी पिंक टॉयलेटची व्यवस्था ४ ठिकाणी करण्यात आली आहे. तसेच माता आणि बालकांच्या सुविधेसाठी ४ हिरकणी कक्षांचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यासोबतच पिण्याच्या पाण्याचे ५३० नळ, पाण्याचे ७० टॅंकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच स्नानगृहांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. रांगेतील अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याची बाटली आणि बिस्किटेही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच रांगेत आसन व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
इंदु मिल येथे लवकरच स्मारक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येथे आलो आहे. देश एवढी प्रगती करतोय, राज्य एवढी प्रगती करतोय त्याचे श्रेय जर कोणाला द्यायचे असेल तर ते डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचे श्रेय आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज कुठलीही समस्या असली तरी त्याचा उपाय संविधानात पाहायला मिळते. मी नरेंद्र जाधव यांचे अभिनंदन करेन, त्यांनी उत्कृष्ट असे पुस्तक लिहिलेय, त्यांनी संविधान तयार करण्याचा सुंदर असा आलेख त्या पुस्तकात मांडला. इंदु मिल येथील स्मारक आपण तयार करत आहोत, त्याला जरा उशीर झाला आहे पण ते लवकर तयार करायचं आहे, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिवादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यघटनेचे निर्माते आणि सामाजिक न्यायाचे प्रतिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रध्दांजली वाहिली. त्यांनी समाज माध्यम, एक्सवर याविषयीचे एक ट्वीट केले आहे. त्यांनी भाररत्न बाबासाहेब आंबडेकर यांना नमन करत असल्याचे म्हटले. समानता आणि मानवी मूल्य जपण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.
https://x.com/narendramodi/status/1864863582997090421?
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की जेव्हा आम्ही त्यांच्या योगदानाची आठवण करतो, तेव्हा त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या वचनबद्धतेचा सुद्धा पुनरुच्चार करतो. जय भीम! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये यावर्षाच्या सुरुवातीला मुंबईतील चैत्यभूमीला भेट दिल्यानंतरचा फोटो शेअर केला. आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 69 वी पुण्यतिथी आहे.
काँग्रेसची बाबासाहेबांना श्रध्दांजली
काँग्रेस पक्षाने पण महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. भारतीय राज्य घटनेचे निर्माते आणि सामाजिक न्यायाचे प्रतिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी नमन. त्यांचा आदर्श आणि विचार अनेक वर्षे आम्हाला न्यायाच्या मार्गावरून जाण्यासाठी प्रेरित करतील, अशी श्रद्धांजली काँग्रेस पक्षाने वाहिली.
https://x.com/INCIndia/status/1864837166221922337?
चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरच्या मदतीने पुष्पवृष्टी
बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यांना भोजन, स्वच्छ व पुरेशी स्वच्छतागृहे, वैद्यकीय सुविधा, राहण्याची सुविधा, वाहतूक व्यवस्था, मदत आणि समन्वय कक्ष, सुरक्षा व्यवस्था अशा सोयी सुविधा प्रशासनाकडून पुरवल्या जातात. त्यात कुठलीही कसर न रागण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहेत. या सुविधा पुरवताना कोणत्याही अनुयायाची गैरसोय होणार नाही, याची सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी.
सूचनांची दखल घेऊन सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन करण्यात यावे. परिसरात पूर्ण स्वच्छता राखण्यात यावी. विविध रेल्वे स्थानकांवर मदत कक्ष उभारण्यात यावेत, असे आदेश काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी संबंधित यंत्रणांना दिले होते.
आढावा घेण्यासाठी प्रशासनाची बैठक
मुंबईतील दादर येथे ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महापरिनिर्वाण दिनाची तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली असून त्यात कोणतीही कमतरता जाणवू नये, असे निर्देश या बैठकीत दिले.
महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त येणाऱ्या अनुयायांना राहण्यासाठी तंबू, आरोग्य सुविधा, पुरेशी शौचालये, जेवण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची सोय, जागोजागी मदत कक्ष स्थापन करावे. येणाऱ्या गर्दीचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश याप्रसंगी दिले. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, नागसेन कांबळे उपस्थित होते.