Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हिंगोली लोकसभा मतदार संघात 62.67 टक्के मतदान,  निवडणूक विभागाची 1026 मतदान केंद्रांवर वेबकास्टींगद्वारे करडी नजर…

Spread the love

पोलिस विभागाचा मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्त | आदर्श सखी, युवा आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांकडून मतदान केंद्रांचे संचलन

हिंगोली : प्रभू नांगरे  | : हिंगोली लोकसभा मतदार संघात 33 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, आज मतदारसंघात 2008 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. 18 व्या लोकसभा निवडणुकीत आज अंदाजे 62.67 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. हिंगोली लोकसभा मतदार संघातील वसमत विधानसभा मतदार संघ 60, हदगाव 66, हिंगोली 60, कळमनुरी 63, किनवट 65 आणि उमरखेड विधानसभा मतदार संघात अंदाजे 62 टक्के मतदान झाले आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 77 हजार 734 मतदार असून, त्यामध्ये 9 लाख 46 हजार 674 पुरुष तर 8 लाख 71 हजार 35 महिला मतदार आहेत. त्याशिवाय इतर 25 मतदारांचा यात समावेश आहे.

निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती एम. एस. अर्चना, निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली, कमलदीप सिंह, निवडणूक निरीक्षक (पोलीस) श्रीमती आर. जयंथी यांनी हिंगोली लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी परीश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडली, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाची वॉर रुममधून वेब कास्टींगद्वारे करडी नजर

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर हे दिवसभर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी 1026 मतदान केंद्रांवर वेबकास्टींगद्वारे करडी नजर ठेवून होते. संपूर्ण लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रिया सुरळीत राहण्यासाठी त्यांनी सतत मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) गणेश महाडीक, उपजिल्हाधिकारी समाधान घुटूकडे यांच्यासह सर्व पथक प्रमुख जिल्हा नियोजन समिती सभागृहातील वॉर रुममध्ये उपस्थित होते. तत्पूर्वी निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली यांनीही वॉर रूमला भेट देऊन निवडणूक प्रक्रियेची माहिती घेतली.
मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक विभागातर्फे प्रयत्न करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून हिंगोली लोकसभा मतदार संघात महिला कर्मचारीद्वारे संचालित मतदान केंद्र- 7, दिव्यांग कर्मचारी संचलित 6 व युवा मतदान केंद्र-6 असे एकूण 19 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले होते, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री.पापळकर यांनी दिली आहे.

या सर्व मतदान केंद्रावर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सावलीसाठी शामियाना, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रॅम्पची सुविधा, व्हील चेअर, दिव्यांग व्यक्तींसाठी पूरक सेवा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी सक्षम ॲपवर नावनोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मतदार संघात आज सकाळपासूनच शहरी व ग्रामीण मतदारांनी मोठ्या उत्साहाने लोकशाहीच्या या उत्सवात भाग घेतल्याचे जागोजागी दिसून येत होते. मतदान प्रक्रिया (मॉक पोल) सुरू असतानाच 39 मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे लक्षात येताच जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून तातडीने मतदान यंत्र बदलवून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!