Mumbai Local Murder | टी-शर्टवरील छोट्याशा लोगोने उघड केली हत्या; मुंबई पोलिसांनी 15 तासांत आरोपीला पकडलं
मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये प्रवाशाची निर्घृण हत्या करून पसार झालेल्या आरोपी रोशन सुवर्णा याला अवघ्या 15 तासांत अटक करण्यात मुंबई रेल्वे पोलिसांना यश आले. या संपूर्ण तपासात कोणताही प्रत्यक्ष पुरावा किंवा मोबाईल लोकेशन उपलब्ध नसताना आरोपीच्या टी-शर्टवरील छोट्याशा कंपनीच्या लोगोनेच पोलिसांना थेट त्याच्यापर्यंत पोहोचवले.
दरवाजा बंद करण्याच्या वादातून हत्या
प्राथमिक माहितीनुसार, धावत्या लोकलमध्ये दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. याच वादातून आरोपी रोशन सुवर्णाने मयंक लोहार या तरुणावर चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या मयंकचा मृत्यू झाला.
हत्येनंतर रोशन सुवर्णाने बोरिवली स्थानकाजवळ धावत्या लोकलमधून उडी मारून पलायन केले. गर्दीचा फायदा घेत तो रेल्वे रुळांवरून पसार झाला. त्यामुळे पोलिसांसमोर आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले.
400 हून अधिक CCTV फुटेजची तपासणी
घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. रेल्वे पोलीस, गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने अंधेरी, बोरिवली आणि परिसरातील 400 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र सुरुवातीला आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता.
टी-शर्टवरील लोगो ठरला मास्टर क्लू
तपासादरम्यान काही प्रवाशांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केलेले व्हिडिओ पोलिसांनी तपासले. त्यामध्ये आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी त्याने घातलेल्या टी-शर्टवरील एका विशिष्ट कंपनीचा लोगो पोलिसांच्या नजरेस पडला. हाच तपासातील सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरला.
थेट कंपनीशी संपर्क, आरोपीची ओळख पटली
लोगोच्या आधारे पोलिसांनी संबंधित कंपनीची माहिती मिळवून व्यवस्थापनाशी संपर्क साधला. कंपनीच्या नोंदी आणि उपलब्ध माहितीद्वारे त्या टी-शर्टचा वापर करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला. काही तासांतच तो टी-शर्ट रोशन सुवर्णा वापरत असल्याचे स्पष्ट झाले आणि आरोपीची ओळख निश्चित झाली.
15 तासांत आरोपी जेरबंद
आरोपीची ओळख पटताच पोलिसांनी विविध ठिकाणी पाळत ठेवून सापळा रचला. हत्येच्या अवघ्या 15 तासांच्या आत रोशन सुवर्णाला अटक करण्यात आली. पोलिस कोठडीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.
या तपासात आधुनिक तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि छोट्याशा टी-शर्टवरील लोगोच्या आधारे मुंबई पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि तपासकौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तुकाराम मुंढे यांची बदली होणार नाही – मंत्री झिरवाळ यांचे विधानसभेत स्पष्ट उत्तर
