Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

तुकाराम मुंढे यांची बदली होणार नाही – मंत्री झिरवाळ यांचे विधानसभेत स्पष्ट उत्तर

Advertisements
Advertisements
Spread the love

राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट दुग्धजन्य पदार्थ, गुटखा आणि तंबाखूविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरू केलेल्या धडक कारवाईदरम्यान विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संभाव्य बदलीबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

Advertisements

विधानसभेत आमदार काशिनाथ दाते यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले की, तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा कोणताही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही.

Advertisements
Advertisements

भेसळविरोधी मोहिमेला आणखी वेग

पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार काशिनाथ दाते यांनी राज्यातील वाढत्या भेसळीच्या प्रकारांबाबत सरकारचे लक्ष वेधले. मे आणि जून महिन्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळयुक्त दूध, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, गुटखा, तंबाखू, मावा आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांचा कोट्यवधी रुपयांचा साठा जप्त केला असल्याची माहिती सभागृहात देण्यात आली.

यावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की, राज्यभरातून 1,930 अन्ननमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून 75 लाख रुपयांचे निर्जंतुकीकरण न केलेले सर्जिकल साहित्यही जप्त करण्यात आले आहे. भेसळविरोधी मोहीम यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विभागाकडे स्वतःची प्रयोगशाळाच नाही

मंत्री झिरवाळ यांनी विभागातील अनेक मूलभूत अडचणी सभागृहात मांडल्या. सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडे स्वतःची प्रयोगशाळा नसल्यामुळे तपासणी प्रक्रियेत अडचणी येत आहेत. मात्र, नाशिक, पुणे, नागपूर आणि यवतमाळ येथे विभागाच्या आधुनिक प्रयोगशाळा लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. तसेच अधिकाऱ्यांच्या कामकाजासाठी भाडेतत्त्वावर वाहनांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

औषध निरीक्षकांची मोठी पदे रिक्त

विभागातील मनुष्यबळाची कमतरताही यावेळी समोर आली. झिरवाळ यांनी सांगितले की, विभागातील 350 मंजूर पदांपैकी 316 पदांवर कर्मचारी कार्यरत असून 43 पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे औषध निरीक्षकांची 200 मंजूर पदे असताना केवळ 41 पदांवरच अधिकारी कार्यरत आहेत, तर तब्बल 159 पदे रिक्त आहेत. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची 197 पदे भरलेली आहेत.

केंद्र सरकारच्या निकषानुसार प्रत्येक एक हजार अन्न आस्थापनांसाठी एका अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची आवश्यकता असते. त्या निकषानुसार राज्यात सुमारे 1,100 अधिकाऱ्यांची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच जिल्हास्तरावर विभागाची स्वतंत्र कार्यालये नसल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली.

मुंढे यांच्या बदलीसाठी 250 कोटी गोळा केल्याचा दावा

चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप करत, तुकाराम मुंढे यांची बदली करण्यासाठी काही औषध कंपन्यांनी तब्बल 250 कोटी रुपये गोळा केल्याचा दावा केला. या दाव्यामुळे सभागृहात काही काळ गदारोळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सरकारकडून या दाव्याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

 

होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पुन्हा सुरू; व्यावसायिक एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावरील निर्बंध हटवले

Tukaram Mundhe, Food Adulteration Maharashtra, FDA Action, Maharashtra Assembly News, Savitribai Phule Scholarship, Pankaja Munde News

आपलं सरकार

Click to listen highlighted text!