होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पुन्हा सुरू; व्यावसायिक एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावरील निर्बंध हटवले
इराण-इस्रायल संघर्षामुळे आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे निर्माण झालेल्या एलपीजी (LPG) पुरवठा संकटातून भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर लावलेले सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या माहितीनुसार, पश्चिम आशियातील परिस्थिती पूर्ववत होत असून एलपीजीचा पुरवठा आता युद्धापूर्वीच्या पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, उद्योग, फूड स्टॉल आणि इतर व्यावसायिक ग्राहकांना पुन्हा नियमितपणे एलपीजी सिलेंडर उपलब्ध होणार आहेत.
युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने सरकारने ‘आवश्यक वस्तू अधिनियम’ अंतर्गत घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या वितरणावर काही निर्बंध लागू केले होते. तसेच C3-C4 स्ट्रीम्सचा वापर पेट्रोकेमिकल उद्योगांऐवजी एलपीजी उत्पादनासाठी वळविण्यात आला होता.
आता परिस्थिती सुधारल्याने सरकारने व्यावसायिक सिलेंडर तसेच बल्क एलपीजी पुरवठ्यावरील सर्व निर्बंध हटवले आहेत. यामुळे उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार असून पुरवठा पूर्ववत होण्यास मदत होईल.
सिलेंडरच्या किंमती कमी होणार का?
पुरवठा सुरळीत झाल्यानंतर व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरातही घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. युद्धकाळात व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. काही ठिकाणी सिलेंडरचा दर सुमारे ₹1,691 वरून वाढून ₹3,113.50 पर्यंत पोहोचला होता. मात्र, सरकारकडून अद्याप दरकपातीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती स्थिर राहिल्यास आणि पुरवठा अखंड सुरू राहिल्यास आगामी काळात व्यावसायिक एलपीजीच्या दरात घट होण्याची शक्यता आहे.
