पेपरफुटी विधेयकावर राहुल गांधींचं ५० मिनिटांचं आक्रमक भाषण; ‘इडियट’ आणि ‘अंधभक्त’ शब्दांवरून लोकसभेत प्रचंड गदारोळ
सार्वजनिक परीक्षा सुधारणा (पेपरफुटी प्रतिबंध) विधेयकावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुमारे ५० मिनिटांचे आक्रमक भाषण करत केंद्र सरकारवर, परीक्षा व्यवस्थेवर आणि विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईवर जोरदार टीका केली. त्यांच्या भाषणातील काही शब्द आणि आरोपांमुळे लोकसभेत मोठा गदारोळ झाला.
राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादाचा उल्लेख करताना ‘इडियट’ आणि ‘अंधभक्त’ हे शब्द वापरले. यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. सभापती ओम बिर्ला यांनी हे शब्द असंसदीय असल्याचे सांगत ते कामकाजातून वगळण्याचे निर्देश दिले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही संबंधित शब्द सभागृहाच्या नोंदीतून हटवण्याची मागणी केली.
याचवेळी राहुल गांधी यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईबाबत गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. या आरोपांवर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी तीव्र आक्षेप घेत, आरोपांना निराधार म्हणत राहुल गांधी यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी केली. रिजिजू यांनी संसदीय नियमांचा हवाला देत अनेक वेळा हस्तक्षेप केला.
सभागृहातील वातावरण तापल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, “देशात फक्त भाजपनेच बोलावे असे तुम्हाला वाटत असेल, तर मी शांत बसेन.”
राहुल गांधी यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करत विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी दावा केला की, विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करण्यात आला आणि याबाबत सरकारने उत्तर द्यावे.
सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटले, “दोनच शक्यता आहेत. एकतर गृहमंत्र्यांनी विद्यार्थ्यांवर कारवाईचे आदेश दिले, किंवा त्यांना याची माहितीच नव्हती. पहिल्या परिस्थितीत ते जबाबदार आहेत, तर दुसऱ्या परिस्थितीत ते आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात अपयशी ठरले आहेत. जर त्यांनी काहीच केलं नसेल, तर ते संसदेत येऊन स्पष्टीकरण का देत नाहीत?”
या वक्तव्यावरूनही सत्ताधारी सदस्यांनी जोरदार विरोध केला.
आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ भूमिका
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात आंदोलन करणारे विद्यार्थी राग किंवा द्वेषातून नव्हे, तर आपल्या भविष्यासाठी लढत असल्याचे सांगितले. “देशाचे भविष्य आज रस्त्यावर उतरले आहे. हे विद्यार्थी केवळ आपला आवाज उठवत आहेत,” असे ते म्हणाले.
तसेच, भाजप नेत्यांच्या मुलांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे सहानुभूतीने पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.
शिक्षण व्यवस्थेवर टीका
पेपरफुटी प्रकरणावर बोलताना राहुल गांधी यांनी परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर निशाणा साधला. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून सरकार तरुणांच्या भविष्याचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच, शिक्षण मंत्रालयाच्या कामकाजावर टीका करत त्यांनी माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यालाही “निव्वळ ढोंग” असे संबोधले आणि शिक्षण व्यवस्थेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव असल्याचा आरोप केला.
देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरू आरएसएसचा माणूस असल्याचा आरोपही त्यांनी केला. धर्मेंद्र प्रधान कधीच मंत्रालय चालवते नव्हते, तर आरएसएसकडून चालवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
गदारोळातही विधेयक मंजूर
राहुल गांधींच्या भाषणादरम्यान झालेल्या गदारोळानंतरही सार्वजनिक परीक्षा सुधारणा (पेपरफुटी प्रतिबंध) विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकावर दोन दिवस मिळून सुमारे नऊ तास चर्चा झाली. सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि भाजप खासदार बासुरी स्वराज यांनी बाजू मांडली, तर विरोधकांकडून गौरव गोगोई, प्रियांका गांधी, अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी चर्चेत सहभाग घेतला.
