पुण्यात जमीन घोटाळ्यावर मोठी कारवाई! १५ महसूल अधिकारी निलंबित; फौजदारी गुन्हे दाखल होणार
महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम १५५ चा गैरवापर करून जमिनींच्या मालकी हक्काच्या नोंदींमध्ये बेकायदेशीर फेरफार केल्याप्रकरणी राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिलेल्या माहितीनुसार उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह १५ महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मागील विधिमंडळ अधिवेशनात विधान परिषद सदस्य अनिल परब यांनी कलम १५५ च्या गैरवापराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
४२४ संशयास्पद प्रकरणांचा उलगडा
चौकशी अहवालानुसार पुणे विभागात ४२४ प्रकरणे संशयास्पद आढळली. त्यापैकी १३ गंभीर प्रकरणांमध्ये थेट जबाबदार असलेल्या १५ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
याशिवाय २४७ प्रकरणांमध्ये नियम ८ अंतर्गत विभागीय चौकशी, तर १६४ प्रकरणांमध्ये नियम १० अंतर्गत तपास करण्याची शिफारस करण्यात आली आहे. काही प्रकरणांमध्ये पुरावे लपवण्यासाठी सरकारी फाईली गायब केल्याचा संशय असून, संबंधितांवर सार्वजनिक अभिलेख अधिनियम, २००५ अंतर्गत स्वतंत्र फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
राज्यभर होणार लेखापरीक्षण
महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, चुकीच्या पद्धतीने हस्तांतरित झालेल्या जमिनी मूळ मालकांना परत मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच गेल्या पाच वर्षांत कलम १५५ अंतर्गत मंजूर झालेल्या सर्व आदेशांचे राज्यव्यापी लेखापरीक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
या तपासासाठी तीन महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली असून, त्याचा सविस्तर अहवाल पुढील विधिमंडळ अधिवेशनात सादर केला जाणार आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून, राज्यभरातील जमीन व्यवहारांची नव्याने छाननी होण्याची शक्यता आहे.
Pune Land Scam, Section 155 Maharashtra, Revenue Department News, Chandrashekhar Bawankule, Maharashtra Breaking News
