OBCAndolanNewsUpdate : ओबीसींवर अन्याय झाला तर आम्हीही आंदोलन करु , ओबीसी नेत्यांचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मराठा आरक्षणासाठी जीव गेला तरीही चालेल मात्र आरक्षण घेतल्याशिवाय मी परत येणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर ओबीसी नेत्यांनी जरांगे यांच्या भूमिकेच्या विरोधात आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, “कायद्याचा कसोटीवर जे काही उतरेल ते देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नियमांमध्ये काय बसतं आहे ते सरकार पाहते आहे. मात्र ओबीसींवर अन्याय होता कामा नये या मतावर आम्ही ठाम आहोत. जर उद्या ओबीसींवर अन्याय झाला हे लक्षात आले तर निश्चितपण ओबीसींचेही आंदोलन सुरु होईल. मला वाटतं की सरकार दोन्ही बाजूंचा विचार करुन योग्य निर्णय घेतील. जी आमची मते आहेत ती आम्ही सभांमधून मांडत असतो. मात्र ओबीसींवर अन्याय झाला तर आम्हीही आंदोलन करु”.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या या मागण्यांवर भाजप आमदार आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की , ‘लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मी कार्यक्रमात असल्याने काय प्रस्ताव दिला हे मला माहिती नाही. सरसकट ओबीसीतून मागणीला आमचा कायमस्वरुपी विरोध आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे , या गोष्टीला आमचा पाठिंबा आहे. मराठा समाज मोठ्या प्रमाणात गरीब लोक आहेत ’.
ओबीसी महासंघाची प्रतिक्रिया
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवडे यांनी म्हटले आहे की , ‘जरांगे म्हणतात ३७ लाख लोकांना प्रमाणपत्र निर्गमित केलं आहे आणि त्यांच्याकडे यादी आहे, तर त्या यादीच्या प्रतिक्षेत आम्ही आहोत. माझ्यामते ज्या काही ५४ लाख नोंदी सापडल्या त्यापैकी ९९ टक्के नोंदी जुन्याच आहेत ’. तसेच ‘जर ३७ लाख लोकांना प्रमाणपत्र मिळालं असेल तर आरक्षण मिळालेलं आहे, तर मग नोकर भरती स्थगित ठेवून जागा रिक्त ठेवण्याच्या मागणीचं कारण काय? मग जागा कोणासाठी रिक्त ठेवायच्या हे जरांगेनी स्पष्ट करायला पाहिजे,’ अशी मागणी तायवडे यांनी केली.
‘सगे सोयरे संदर्भात निर्णय घेणं राज्य सरकारच्या हातात नाही, आपली पितृसत्ताक असल्याने वडिलांची जात मुलांना लागते, आईकडची जात लागत नाही,’ असे वक्तव्यही तायवडे यांनी केले. तसेच जरांगे मागणी करत असलेले सर्व नियम जुनेच आहेत. १२ वी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण आहेच, त्या पुढच्या शिक्षणासाठीही मदत मिळते, असे तायवडे म्हणाले. दरम्यान जरांगेंच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मान्य झाल्यांच चित्र आहे, त्यामुळे रात्रभरात आंदोलन समाप्त होईल, अशी अपेक्षाही तायवडे यांनी व्यक्त केली आहे. दाखल केलेले सगळेच गुन्हे मागे घेण्याचा अधिकार शासनाला नाही, त्यामुळे गुन्हे मागे घेता येणार नाहीत. सध्याच्या घडामोडींवरून ओबीसींचं नुकसान होईल, असे वाटत नाही पण आम्ही सरकार आणि जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहोत, असेही तायवडे यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत असेल तर हे सहन केले जाणार नाही. सगे सोयरे आणि ५४ लाख मराठ्यांना आरक्षण दिले तर मग आमच्या आरक्षणात उरले काय ? असा प्रश्न ओबीसी नेते प्रकाश शेंडगे उपस्थित केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांच्याविरोधात छगन भुजबळ यांनी शड्डू ठोकले होते. कारण ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली. त्यानंतर छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपही झाले. भुजबळ यांनी ओबीसी एल्गार मेळावे आयोजित करून महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा घेतल्या. मात्र मागच्या तीन सभांना त्यांनी उपस्थिती लावलेली नाही. त्यांचे सहकारी आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, भुजबळ आता सरकारी पातळीवर लढाई लढतील आणि आम्ही मैदानात लढाई लढू.
भास्कर जाधव यांची भुजबळांवर टीका
दरम्यान माध्यमांशी बोलत असताना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की , “छगन भुजबळ यांना भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने ओबीसींची बाजू घेऊन लढा, असे सांगितले होते. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठ्यांची बाजू घेण्यास भाजपाने सांगितले गेले. त्यातून ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. तुम्ही जामीनावर बाहेर आहात, हे लक्षात ठेवा, असेही भुजबळांना सांगण्यात आले होते. त्यामुळे छगन भुजबळ उसने अवसान आणून लढत होते. पण लढाई जिंकण्यासाठी उसने अवसान आणून चालत नाही, हे कळल्यानंतर भुजबळांना घरी बसावं लागलं.”
मराठा समाजाच्या आरक्षणावर तोडगा निघालाच पाहीजे, असंही भास्कर जाधव म्हणाले. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर सभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाला स्पर्श करत मी मराठ्यांना आरक्षण देणारच, असा शब्द दिला होता. वर्तमान राज्यकर्त्यांनी फसवणुकीचा उद्योग केला असल्यामुळे मराठा समाजाचा हा उद्रेक झाला, असेही भास्कर जाधव म्हणाले. तसेच ओबीसी समाजाने संयम बाळगावा. तसेच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिलेल्या शब्दाप्रमाणे आरक्षण द्यावे, आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, असेही भास्कर जाधव म्हणाले.
तर ओबीसीही आंदोलनाला उतरतील…
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा नवी मुंबईत आल्यानंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “कायद्याचा कसोटीवर जे काही उतरेल ते देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नियमांमध्ये काय आहे, ते सरकार पाहतं आहे. मात्र ओबीसींवर अन्याय होता कामा नये. या मतावर आम्ही ठाम आहोत. जर उद्या ओबीसींवर अन्याय झाला, हे लक्षात आलं तर निश्चितपण ओबीसींचंही आंदोलन सुरु होईल. मला वाटतं की सरकार दोन्ही बाजूंचा विचार करुन योग्य निर्णय घेतील. जी आमची मतं आहेत ती आम्ही सभांमधून मांडत असतो. मात्र ओबीसींवर अन्याय झाला तर आम्हीही आंदोलन करु.”
मराठा आंदोलकांचा चक्का जाम, रस्त्यांवर गाड्यांची रांगच रांग
नवी मुंबईत वाशी शिवाजी चौक ते आरेंजा कॉर्नर तसेच वाशी शिवाजी चौक ते वाशी स्टेशन कडे जाणारा रस्ता वाशी शिवाजी चौक ते वाशी अग्निशमन केंद्र अशा चारही दिशेला सतत वाहतूक कोंडी पहायला मिळते. परंतु आज या ठिकाणी मराठा आंदोलकांचा चक्का जाम झाला असून सर्व रस्त्यांवर मराठा आंदोलक आणि त्यांच्या गाड्यांची रांगच रांग लागली आहे.
हे लक्षात घेऊन वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये मुक्कामी असलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी मुंबई पोलीस पोहोचले आहे. वीरेंद्र मिश्रा, सहाय्यक पोलीस उपायुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त झोन ७ चे पुरुषोत्तम कराड हे जरांगे पाटील यांना भेटायला आले आहे. शनिवारी मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर जाण्याचे घोषित केले आहे. या पोलीस अधिकाऱ्यांनी पोलिसांना विनंती केली आहे मुंबईत येवू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मागण्या मान्य झाल्या आहेत. जर आपण इथूनच आंदोलन संपवलं तर उत्तम आहे, अशी विनंती पोलिसांनी केली आहे.
मनोज जरांगेंची मुंबई पोलिसांना विनंती
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचा मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. आज २६ जानेवारी रोजी त्यांनी वाशी येथे भव्य जाहीर सभा घेऊन आज नवी मुंबईतच थांबणार असल्याचा निर्धार केला. मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेल्या सुधारणा केल्यास गुलाल घेऊन मुंबईत येऊ अन्यथा आंदोलनाकरता येऊ, असा इशारा पाटलांनी आज दिला. दरम्यान, मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाल्याने कायदा सुव्यवस्था आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आज मनोज जरांगे पाटलांची भेट घेतल्याचं माध्यमांतून सांगण्यात येतंय. या भेटीनंतर मनोज जरांगे पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला.
मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावरील आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली आहे. परंतु, तरीही ते मुंबईत येणार असल्याच्या निर्णयावर ठाम आहेत. याबाबत ते म्हणाले, आम्ही सांगितलेल्या सुधारणांचा अध्यादेश येणार की नाही ही जर-तरची गोष्ट आहे. अध्यादेश आला तरी आम्ही गुलाल घेऊन मुंबईत येणार आहोत. आणि अध्यादेश नाही आला तरी आम्ही मुंबईत येणार आहोत, असं मनोज जरांगे म्हणाले. परंतु, या काळात आम्ही मुंबई पोलिसांना सहकार्य करणार आहोत. अध्यादेश आला तर आम्ही त्यांचा मान-सन्मान करू. आनंदाच्या भरात आम्ही मुंबई पोलिसांना मान-सन्मान करू असंही पाटील म्हणाले.
दरम्यान, मुंबई आणि आजूबाजूच्या शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याने काही मराठा आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत जरांगे म्हणाले, सरकार आणि गृहविभागाकडून गैरसमज पसरता कामा नये. मराठा समाजातील बांधवांपैकी कोणीही काहीही करत नाहीत. ते शांततेत मुंबईत आले आहेत. त्यांना मुंबईच्या गल्ल्या माहित नाहीत. त्यामुळे कोणी कुठे चुकून शिरल्यामुळे ट्राफिक जाम होत असेल. त्याचा अर्थ असा नाही की काही वाईट घटना करायच्या आहेत. मराठा बांधवांना अटक केली असेल तर सोडून द्यावं. ट्राफिक जाम झाली असेल हे मी मान्य करतो. पण त्यांना मुंबईतील रस्ते माहित नाहीत. जाणूनबुजून काही होणार नाही. पोलीसांनी त्यांना साथ द्यावी. तातडीने त्यांना सोडून द्यावे , असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.