Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : दिल्लीसह पाच राज्यात कोरोनाने टेन्शन वाढवले , पण घाबरू नका काळजी घ्या …

Spread the love

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांचे आकडे वाढत असल्याने दिल्लीसह पाच राज्यांचे टेन्शन वाढले आहे . शासकीय माहितीनुसार दिल्लीत आज एक हजारावर नवीन रुग्णांची भर पडली आहे तर एक रुग्ण करोनाने दगावला आहे. दरम्यान, महाराष्ट्राची राजधानी मुंबईतही दैनंदिन रुग्णसंख्या पुन्हा एकदा शंभरीच्या जवळ पोहचली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिल्लीत कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी पुन्हा मास्कची सक्ती करण्याचे धोरण आखले जात असून मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही राज्यातील जनतेला योग्य ती खबरदारी घेण्याचे सांगितले आहे. 

दरम्यान भारतात जून महिन्याच्या अखेरपर्यंत करोना संसर्गाची चौथी लाट येणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला असताना दिल्ली , हरयाणा , उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि मिझोराम या राज्यांत गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत पुन्हा वाढ दिसू लागली आहे. यापैकी दिल्लीतील स्थिती अधिक गंभीर असून दैनंदिन रुग्णसंख्येने आज हजाराचा टप्पा ओलांडल्याने दिल्ली हादरली आहे. दिल्लीत गेल्या २४ तासांत करोनाचे १००९ नवे रुग्ण आढळले आहेत तर ३१४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजचा कोविड पॉझिटिव्हिटी रेट ५.७० इतका राहिला. मंगळवारी दिल्लीत ६०१ रुग्ण आढळले होते. त्यात आज मोठी वाढ झाल्याने आता सक्रिय रुग्णांचा एकूण आकडा २ हजार ६४१ इतका झाला आहे. करोनाचा वाढता धोका लक्षात घेत दिल्लीत येत्या काही दिवसांत कठोर निर्णय घेतले जातील असे संकेत मिळू लागले आहेत.

मुंबईतही कोरोनाची कासवगती

आजच्या माहितीनुसार गेल्या २४ तासात राज्यात आज १३७ नवीन रुग्णांची भर पडली असून ३ रुग्ण करोनाने दगावले तर एकट्या मुंबईत कोरोनाचे ९८ रुग्ण आढळले. मंगळवारी मुंबईत ८५ रुग्णांची नोंद झाली होती. त्यात आज किंचित वाढ झाली. या स्थितीवर मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा बारीक लक्ष ठेवून आहे. मुंबईत करोनाचे सध्या ४१५ सक्रिय रुग्ण आहेत तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के इतके आहे. १३ एप्रिल ते १९ एप्रिल या कालावधीत कोविड वाढीचा दर ०.००५ टक्के इतका राहिला आहे.

काळजीचे कारण नाही पण राज्यातील जनतेने काळजी घ्यावी : राजेश टोपे

खरे तर राज्यात कोरोना नियंत्रणात आल्यामुळे राज्य सरकारने नुकतेच २ एप्रिल अर्थात पाडव्यापासून राज्यातील सर्व प्रकारचे निर्बंध उठवले आहेत. या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया जरी उमटल्या असल्या, तरी राज्यातलं जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलेलं असतानाच गेल्या दोन दिवसांत रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्यामुळे काहीशी शंका उपस्थित केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना, एकाच दिवसात दुपटीहून जास्त रुग्ण वाढले असले, तरी घाबरण्याचं कारण नसल्याचे  म्हटले आहे. “केंद्रानं दिलेल्या पत्रात काही राज्यांचा उल्लेख केला आहे. काल मी घेतलेल्या आढाव्यात महाराष्ट्रात एकूण १३५ केसेस आढळल्या आहेत. त्यात मुंबईमध्ये ८५ केसेस आहेत. महाराष्ट्राने ६० हजार केसेस रोज पाहिल्या आहेत. त्यामुळे अतिशय नियंत्रित अशी ही परिस्थिती आहे. कुठेही घाबरण्याचं कारण नाहीये. लसीकरणाचं प्रमाण देखील चांगलं झालं आहे”, असं राजेश टोपे म्हणाले.

लसीकरणाचे आवाहन

दरम्यान, राजेश टोपेंनी सर्वांनी लसीकरण करून घेण्याचे  आवाहन केले  आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचा देखील सल्ला त्यांनी दिला आहे. “१२ ते १८ वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाला देखील आम्ही प्रोत्साहन देत आहोत. त्यासाठी जनजागृती करतो आहोत. लसीकरण स्वत:च्या सुरक्षेसाठी महत्त्वाचं आहे. बूस्टर डोससंदर्भात केंद्र सरकारने तसे निर्देश दिले आहेत. लोकांनी खासगी केंद्रात शुल्क देऊन बूस्टर डोस घ्यायला हरकत नाही. पण आज काळजीचा विषय नाही. आपण निर्बंध मुक्त केले आहेत. मास्कसक्ती हटवली आहे. पण ज्येष्ठ नागरिक किंवा सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींनी गर्दीत मास्क घालण्याची काळजी घ्यावी”, असं ते म्हणाले.

परिस्थितीवर लक्ष आहे…

वाढलेले रुग्ण ही चिंतेची बाब नसल्याचं नमूद करतानाच आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं राजेश टोपे म्हणाले. “आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. पाश्चात्य देश, युरोप, चीनमध्ये असलेली परिस्थिती जर आपल्याला जाणवली, काही प्रमाणात दिल्लीतही रुग्ण वाढत आहेत, तर त्या पद्धतीने आयसीएमआर, केंद्र सरकार, आमचं टास्क फोर्स, आरोग्य विभाग या सगळ्या गोष्टीत लक्ष ठेवून आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल”, असेही  राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!