Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GunratnaSadavarteNewsUpdate : मोठी बातमी : सातारा न्यायालयाने दिला जामीन पण गुणरत्न सदावर्ते आता कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात…

Spread the love

मुंबई : मुंबईच्या गिरगाव कोर्टाने कोल्हापूर पोलीसांचा अर्ज मंजूर करून त्यांना गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा दिला आहे. कोल्हापूर पोलीस आर्थर रोडमधून सदावर्तेंचा ताबा घेऊन त्यांना  कोल्हापूर न्यायालयात हजर करतील आणि पोलीस कोठडीची मागणी करतील असे सांगितले जात आहे. दरम्यान कोल्हापूर बरोबरच बीड येथेही सदावर्ते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या जामिनासाठी बीड न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे.

आणखी एका वृत्तानुसार गुणरत्न सदावर्ते यांना सातारा न्यायालयाने जामीन दिला असून त्यांच्यावर साेलापूरात आणखी एका प्रकरणात आजच गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान मराठा समाजा विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गिरगाव न्यायालयाने सदावर्तेंना काेल्हापूर पाेलिसांच्या ताब्यात दिले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या अटकपूर्व जामिनावर कोल्हापुरात उद्या सुनावणी होणार होती त्याच्या आधीच कोल्हापूर पोलिसांनी सदावर्ते यांना ताब्यात घेतले आहे. सदावर्ते यांच्यावर कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिसात कलम १५३ नूसार गुन्हा दाखल आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल तसेच एकोप्याला बाधा येईल अशी कृती केल्याचे तक्रार मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांनी केली हाेती.

मुंबई  : गावदेवी पोलिसांची पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी फेंटाळून लावत एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांना आज गिरगाव कोर्टाने १४ दिवसांची पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान त्यांचा ताबा मिळावा म्हणून कोल्हापूर पोलिसांनी गिरगाव न्यायालयात अर्ज केला होता हा अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात मराठा आरक्षण प्रकरणी न्यायाधीशांचा अवमान केल्याच्या आरोपावरून आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. 

आज न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने प्रदीप घरत यांनी पोलिसांची बाजू मांडत आणखी पोलीस कोठडीची मागणी केली त्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतःच आपला युक्तिवाद केला. एसटी कर्मचाऱ्यांकडून गुणरत्न सदावर्ते यांनी पैसे घेतले होते आणि त्या पैशातून मालमत्ता, गाडी खरेदी केली, त्यांच्या घरात नोटा मोजण्याचे मशीन सापडले त्यामुळे याप्रकरणाच्या तपासाकरता पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली. विशेष म्हणजे सरकारी वकील प्रदिप घरत यांनी हर्षद मेहता प्रकरणाचा निकाल सदावर्ते प्रकरणात संदर्भम्हणून वाचून दाखवला.

गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतःच केला युक्तिवाद

आज गिरगाव कोर्टात  गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये स्वत: युक्तीवाद करत आपली बाजू मांडली. सदावर्ते यांच्या बाजूने आज कोर्टात कुणीच वकील आले  नसल्याने त्यांनीच आपली बाजू मांडली. गुणरत्न सतावर्ते म्हणाले, पोलीस हे दाखवण्याचा प्रयत्न करतायेत की हा एक मोठा स्कॅम आहे. मी कष्टकऱ्यांचा वकील आहे . मी एसटी कर्मचाऱ्यांकडून ३०० ते ५०० रुपये घेतले पण ते फक्त न्यायालयीन कामकाजाकरता घेतले. एवढे कमी पैसे कोणता वकील घेतो ? हे सांगावे असाही प्रश्नही सदावर्ते यांनी न्यायालयात उपस्थित केला.

मी कष्टकरांच्या वकील आहे… हर्षद मेहता नाही…

आपल्या युक्तिवादात सदावर्ते म्हणाले कि , जी संशयास्पद कागदपत्र पोलीस जप्त केले म्हणतात ते वकालत नामे आहेत. माझ्या प्रकरणात हर्षद मेहता प्रकरणाचा दाखला दिला गेला दुःखद आहे. माझे सासू सासरे स्वातंत्र्य सैनिक आहेत. गाडी घेतली त्याची नोंद आरटीओमध्ये आहे. गाडी घेण्याकरता पैसे दिले ते ऑनलाईन  दिल्याचे पुरावे आहेत. गाडी जुनी आहे, २०१४ ची जुनी गाडी मी खरेदी केली आहे. नोटा मोजण्याची मशीन ३ हजाराला घेतले आहे, आपण मुंबईत राहतो. मी कष्टकरांच्या वकील आहे… हर्षद मेहता नाही… मी हर्षद मेहता होवू शकत नाही.

मी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले, पण…

दुसऱ्या एका गुन्ह्यात सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी मी अर्ज केला आहे म्हणून पोलीस माझी कोठडी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा त्यांनी यावेळी केला. मी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले, पण याबाबत कोणीही तक्रार केली नाही. आर्थिक व्यवहार तपासायचे असल्यास पोलीस कोठडीची काय गरज? पोलीस पहिल्या दिवशी माझ्या घरी आले तेव्हा त्यांनी सगळी तपासणी केली आहे. माझ्या घरी फक्त १३ वर्षांची मुलगी आहे आणि ती देखील पोलिसांना सहकार्य करत आहे, असेही यावेळी सदावर्ते म्हणाले.

दरम्यान न्यायालयाने दोन्हीही बाजू ऐकल्यानंतर गावदेवी पोलिसांची पुन्हा पोलीस कोठडीची मागणी अमान्य करीत न्यायालयाने सदावर्ते यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची आदेश दिले. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी कोर्टात आपला अर्ज दाखल करत सदावर्ते यांचा ताबा देण्याची मागणी केली आहे. कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या या अर्जावर थोड्यावेळात सुनावणी होणार आहे.

सदावर्ते यांच्याविरुद्ध कुठे कुठे गुन्हे दाखल आहेत ?

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्ला बोल आंदोलनांनंतर अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची मालिका सुरुच आहे. मुंबई, सातारा, कोल्हापूर, अकोट, आणि  आता सोलापुरातही गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला असून  मराठा आरक्षणाच्या निकाला संदर्भात न्यायालयाच्या निकालाचा अवमान केल्याबद्दल आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी छावा संघटनेचे शहराध्यक्ष योगेश पवार यांच्या तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद झाली आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात हे वक्तव्य केल्याचा पुरावा देत कलम 153अ, 153 ब, 500, 505 (1), 505 (2), न्यायालय अवमान अधिनियम 1971 कलम 2 अनुसारगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिसात गुन्हा

अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल, एकोप्याला बाधा येईल अशी कृती केल्याप्रकरणी त्यांच्यावर भा.द.वि.स कलम 153 (अ) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. मराठा आरक्षण विरोधी न्यायालयीन लढा लढण्यासाठी सदावर्ते यांनी बेकायदेशीरपणे पैसे जमवण्याचा तसंच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत अखेर कोल्हापुरात सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

अकोट पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा

अकोल्यात अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांची पत्नी अॅड जयश्री पाटील यांच्याविरोधात अकोट शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. एसटी आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांकडून अवैधपणे पैसे जमा केल्याबद्दल हा गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेनाप्रणित महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी यासंदर्भात ८ जानेवारी २०२२  रोजी अकोट पोलिसात तक्रार दिली होती. तब्बल चार महिन्याच्या विलंबानंतर सदावर्तेंसह चार जणांवर गुन्हे दाखल झाला आहे. अकोटमधील कर्मचाऱ्यांकडून ७४ हजार ४०० रुपये सदावर्तेंकडे जमा करण्यात आल्याचे  मालोकार यांनी म्हटले आहे. हे पैसे औरंगाबादेतील अजयकुमार गुजर यांच्यामार्फत सदावर्तेंपर्यंत पोहोचवण्यात आल्याचे पुरावे मालोकार यांनी पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणात सदावर्ते यांच्या अँटनी जयश्री पाटील यांनी अटकपूर्व जामिनासाठी अकोट न्यायालयात अर्ज दिला आहे. त्यावर उद्या सुनावणी होणार आहे.

छत्रपतींच्या वारसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी साताऱ्यात गुन्हा

दरम्यान साताऱ्यात छत्रपती शिवरायांच्या वारसाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दोन वर्षांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी एका खाजगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे संभाजीराजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे या प्रकरणात त्यांना सातारा न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!