Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : ओमायक्रानच्या पार्श्वभूमीवर जिल्हा टास्क फोर्स समितीने घेतले महत्वपूर्ण निर्णय

Spread the love

टास्क फोर्स समितीत घेतलेल्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण


औरंगाबाद  : कोविड संसर्गचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व ओमायक्रॉन विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा टास्क फोर्स समितीने अनेक निर्णय घेतलेले आहेत. या निर्णयांची संबंधित यंत्रणेने काटेकोर अंमलबजावणी करून ओमायक्रोन विषाणू संसर्गापासून आपल्या जिल्ह्याचे संरक्षण करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज कोविड टास्क फोर्सची बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते.


या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, पोलीस अधीक्षक निमित गोयल, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, सहआयुक्त बी.बी. नेमाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीप कुलकर्णी, मनपा आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा,तसेच जिल्हा टास्क फोर्स समितीचे सर्व सदस्य, विभागप्रमूख यांच्यासह घाटी रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महानगरपालिकेतील आरोग्य यंत्रणेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत शहरातील चौकाचौकात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना दंड करणे, प्रत्येक तालुका आरोग्य अधिकारी यांच्या समन्वयाने खासगी रुग्णालयात ओपीडी बरोबरच आरटीपीसीआर तपासणी सक्तीची करावी, कोविड पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त नागरिकांचे गृह विलगीकरण बंद करुन संस्थात्मक विलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच लसीकरण कामकाजात अडथळा आणणाऱ्या शिवाजीनगर परिसरातील नीलकमल फर्नीचर सील करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.

ओमायक्रॉन संसर्ग तपासणीमध्ये महत्वच्या ‘जिनोम सिक्वेन्सींग’ तपासणीसाठी प्रयोगशाळेचा प्रस्ताव तयार करून शासनास पाठविण्याचे निर्देश घाटी प्रशासनाला दिले. डिसेंबर माहिन्याअखेर मोठे उत्सव, लग्न समारंभ, आणि अनावश्यक गर्दीच्या कार्यक्रमाचे आयोजन न करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. जिल्हयात कोविड चाचण्या वाढवाव्यात, ज्या नागरिकांचा दुसरा डोस राहिलेला आहे त्यांनी तो तात्काळ घ्यावा, लसीकरणासाठी अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. ऑक्सीजन बेड, आणि आयसीयु बेड, यासह विशेष बेडची सुविधा सज्ज ठेवण्याबाबत आरोग्य यंत्रणेला सूचित करण्यात आले.
शहरातील चौकाचौकात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या संदेशाचे टि शर्ट व कॅप घातलेल्या प्रशासनाकडून नियुक्त कर्मचाऱ्यांकडून लसीकरण आणि मास्क घालण्याबाबत संदेश दिला जाणार असून संबधित कर्मचाऱ्याला बिना मास्क वाहन धारक दिसल्यास संबंधित गाडीचा फोटो परिवहन विभगाकडे पाठवला जाणार आहे. यानंतर अशा वाहन धारकास परिवहन विभागामार्फत नोटीस दिली जाणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!