SharadPawarHealthUpdate : शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया; लवकरच डिस्चार्ज

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. पोटदुखीच्या त्रासामुळं त्यांना मंगळवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . तिथे काल रात्री उशिरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
पोटदुखीचा त्रास झाल्यानं पवार यांना सोमवारी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते . पित्ताशयातील खडे हे त्यांच्या पोटदुखीचे कारण असल्याचे तपासणीतून पुढे आले . त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही शस्त्रक्रिया आज होणार होती. मात्र, मंगळवारी रात्री पुन्हा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर एन्डोस्कोपीद्वारे त्यांच्या पित्ताशयातील खडे काढून टाकण्यात आले. त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज असून ती कधी करायची याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी माहिती डॉक्टर अमित मायदेव यांनी दिली. सध्या शरद पवार यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.