Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बनावट मतदान ओळखपत्र तयार करणारे दोघे गजाआड

Spread the love

औरंंगाबाद : निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या मतदान ओळखपत्रात फेरफार करुन बनावट ओळखपत्रे तयार करुन देणा-या टोळीचा निवडणूक विभाग आणि पुंडलिकनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला. हरिश धुराजी वाघमारे (वय २२, रा. गजानन कॉलनी, गारखेडा परिसर) आणि महा-ई-सेवा केंद्रातील नोकर नवनाथ भक्तदास शिंदे (वय २६, रा. योगेश्वरी नगर, गारखेडा परिसर) अशी अटकेतील दोघांची नावे असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाचे तहसीलदार शंकर लाड व त्यांचे पथक बुधवारी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आले. त्यावेळी पथकाने एक दुकानदार निवडणूक आयोगाचे बनावट ओळखपत्र तयार करुन देत असल्याची माहिती दिली. या माहितीवरुन पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर तहसीलदार शंकर लाड, नायब तहसीलदार रेवणनाथ ताठे, सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, प्रभाकर सोनवणे, धनाजी आढाव, जमादार रमेश सांगळे, पोलीस नाईक बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, राजेश यदमळ, माया उगले आदींच्या पथकाने स्वामी समर्थ मंदीरासमोरील गजानन कॉलनीत असलेल्या मातोश्री डिजीटल या दुकानावर छापा मारुन हरिश वाघमारे व त्याचा नोकर नवनाथ शिंदे या दोघांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान, हरिश वाघमारे याने त्याच्या दुकानातील संगणकात डाऊनलोड करून ठेवलेल्या वेबसाईटवर जाऊन बनावट ग्राहकाच्या निवडणूक ओळखपत्राचा डाटा घेतला.त्यानंतर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरुन कॉपी करत अपलोड केला. त्यानंतर त्याने बनावट आणि हुबेहुब दिसणारे ओळखपत्र तयार करून त्यावर मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची बनावट ऑनलाईन स्वाक्षरी घेतली. त्यानंतर तयार झालेले बनावट ओळखपत्राची कॉपी मेलव्दारे हनुमान चौकातील सुपर फास्ट महा-ई-सेवा केंद्रात पाठवली. त्याच दुकानातून बनावट ग्राहकाला निवडणूक आयोगाचे बनावट ओळखपत्र दिले होते. याप्रकरणी नायब तहसीलदार रेवणनाथ ताठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!