#CoronaVirusUpdate : राज्यातील कोरोना अहवाल दिलासादायक ! जवळपास ९४ % कोरोना चाचण्या निगेटिव्ह !

देशात , राज्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी दिवसभरात राज्यात एकूण ७७८ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ६४२७ वर पोहोचली आहे. मात्र , यातून सुद्धा एक दिलासादायक बाब समोर आली आहे.
कोरोना बाबतीत राज्याचे मंत्रिमंडळ झपाट्याने निर्णय घेत असून राज्यात दररोज ७ हजारांपेक्षा जास्त लोकांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. यामध्ये सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार आतापर्यंत झालेल्या एकूण चाचण्यांपैकी जवळपास ९४ टक्के चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे राज्याला थोडा दिलासा मिळाला आहे.
राज्यात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या सर्वाधिक असल्याने रुग्णांचे निदान होण्याच्या संख्येत वाढ होत आहे. मंगळवारपर्यंत राज्यात ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी सात दिवसांवर गेला आहे. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंध आणि उपचार केले जात आहेत. त्यामुळे, घाबरून जाण्याची गरज नाही असा दिलासाही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे, महाराष्ट्रातील कोरोना हॉस्पिटलची संख्या १४ वरून ५ वर आणण्यात यश मिळाल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.