औरंगाबाद जिल्ह्यातील पेटवून दिलेल्या पीडितेची प्राणज्योत मालवली
हिंगणघाट इथं झालेल्या प्राध्यपिका जळीत प्रकरणातील पीडित मृत्यूशी झुंज देत आहे. तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये घरात घुसून एका महिलेला पेटवण्यात आलं होतं. 95 टक्के भाजलेल्या या महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात ही घटना घडली होती. आरोपी संतोष मोहितेने घरात घुसून ५० वर्षीय पीडित महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिलं होतं. यामध्ये पीडित महिला ९५ टक्के गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू होती. मात्र, संध्याकाळी या महिलेनं अखेरचा श्वास घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्याच गावात राहणारा आहे. संतोष मोहिते असं आरोपीचं नाव आहे. आरोपी संतोष मोहिते हा गावात बिअर बार चालवतो. आरोपी पीडितेच्या घरी गेला आणि तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली होती. परंतु, पीडितेने नकार दिल्यामुळे आरोपीने तिला रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी आरोपी संतोष मोहिते पोलिसांच्या अटकेत आहे.