मुंबईत मोठा घातपाताचा कट उधळला? मोहरम मिरवणुकीत विषारी कॅप्सूल वाटणारा फय्याज प्रेमजी अटकेत; दहशतवादी अँगलने तपास
मुंबई पोलिसांनी मोहरम मिरवणुकीदरम्यान घडू शकणारा संभाव्य मोठा अनर्थ वेळीच टाळला आहे. भायखळा परिसरात आयोजित मोहरमच्या मिरवणुकीत भाविकांना हर्बल पेनकिलर असल्याचे सांगून झिंक फॉस्फाइड (उंदीर मारण्याचे विष) भरलेल्या कॅप्सूल वाटणाऱ्या फय्याज प्रेमजी या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास घातपात, कट्टरपंथी प्रेरणा किंवा दहशतवादी कट अशा विविध अंगांनी सुरू आहे.
14,900 विषारी कॅप्सूल जप्त; 50 किलो झिंक फॉस्फाइडची ऑनलाइन खरेदी
पोलिसांच्या तपासात आरोपीने 50 किलो झिंक फॉस्फाइड पावडर आणि 30 हजार रिकाम्या कॅप्सूल ऑनलाइन मागवल्याचे उघड झाले आहे. डोंगरी येथील हॉटेलमध्ये राहून त्याने प्रत्येक कॅप्सूलमध्ये सुमारे एक ग्रॅम झिंक फॉस्फाइड भरले आणि तीन-तीन कॅप्सूलचे पॅकेट तयार केले. पोलिसांनी त्याच्याकडून 14,900 तयार कॅप्सूल जप्त केल्या असून उर्वरित कॅप्सूलचा शोध सुरू आहे.
महिलेच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला प्रकार
मिरवणुकीत कॅप्सूल वाटणाऱ्या फय्याजवर एका महिलेचा संशय आला. तिने एक कॅप्सूल उघडून पाहिली असता त्यामध्ये राखाडी रंगाची पावडर आढळली. तिने तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्याचवेळी काही जणांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला.
यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत लाऊडस्पीकरवरून नागरिकांना त्या कॅप्सूल न घेण्याचे आवाहन केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
उच्चशिक्षित आरोपी; इराण-इराक दौऱ्यांची चौकशी
अटक करण्यात आलेला फय्याज प्रेमजी हा पुण्यातील विमाननगर परिसरातील रहिवासी असून त्याने बीबीए (Bachelor of Business Administration) शिक्षण घेतले आहे. त्याच्या वडिलांचा पेंट व्यवसाय असून तो त्यामध्ये मदत करत होता. गेल्या वर्षी तो इराण आणि इराकमध्ये काही काळ नोकरीसाठी गेला होता. त्याच्या परदेश दौऱ्यांचा आणि संपर्कांचा तपास आता यंत्रणा करत आहेत.
‘लोन वुल्फ’ हल्ल्याची शक्यता तपासात
पोलिस, गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी पथक (ATS) या प्रकरणाचा संयुक्त तपास करत आहेत. हा हल्ला कोणत्याही संघटनेच्या मदतीशिवाय एकट्याने आखण्यात आला होता का, म्हणजेच ‘लोन वुल्फ’ प्रकारातील कट होता का, याचाही तपास सुरू आहे.
यासाठी आरोपीचा मोबाईल, आर्थिक व्यवहार, सोशल मीडिया आणि संपर्कातील व्यक्तींची माहिती तपासली जात आहे.
मानसिक स्थितीचाही तपास
प्राथमिक चौकशीत आरोपी दीर्घकाळ झोप न घेणे, वैद्यकीय सल्ल्याशिवाय विविध औषधे घेणे आणि समाजातील एका विशिष्ट घटकाविषयी द्वेषाची भावना बाळगत असल्याचे समोर आले आहे. त्याच्या मानसिक आरोग्याचीही तपासणी केली जात असून या घटनेमागील नेमका हेतू शोधण्याचे काम सुरू आहे.
झिंक फॉस्फाइडची निवड का?
झिंक फॉस्फाइड हे उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे अत्यंत विषारी रसायन आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील कलिंगड प्रकरणात याच विषामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्या घटनेतून प्रेरणा घेऊन आरोपीने हे रसायन निवडले का? याचाही तपास सुरू आहे.
पोलिसांचा तपास सुरू
मुंबई पोलिसांनी या प्रकरणात घातपात, दहशतवादी कट, मानसिक आजार किंवा वैयक्तिक प्रेरणा अशा सर्व शक्यता खुल्या ठेवल्या आहेत. तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Mumbai Moharram News, Fayyaz Premji, Zinc Phosphide Capsules, Mumbai Police Investigation, Terror Angle
