फलटण महिला डॉक्टर प्रकरणातील तपशील उघड : मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत खुलासा
फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून टाकले असताना, आज विधानसभेत या प्रकरणावर मोठी चर्चा झाली. सभागृहातील प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासातील महत्त्वपूर्ण मुद्दे मांडत प्रकरणाची सद्यस्थिती स्पष्ट केली.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की या घटनेनंतर जनमानसात निर्माण झालेल्या दुःखाची शासन गंभीर दखल घेत आहे. “या प्रकरणाला आम्ही प्राधान्य देत असून एसआयटीसह (SIT) न्यायिक चौकशी समिती नेमण्यात आली आहे. तपास पारदर्शक आणि निष्पक्षपणे सुरू आहे,” असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी उघड केले की फॉरेन्सिक तपासानुसार डॉक्टर महिलेच्या हातावर लिहिलेला मजकूर तिच्याच हस्ताक्षरात आढळला आहे. तसेच, गळफास लावूनच मृत्यू झाल्याचेही वैज्ञानिक तपासातून सिद्ध झाले आहे.
पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या शोषणाची खात्री
या प्रकरणात आरोपी पोलीस अधिकारी बदने याने महिलेची फसवणूक करून तिचे शारीरिक शोषण केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. लग्नाचे आमिष दाखवून नंतर भूमिका बदलल्याचेही पुरावे मिळाले आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत दुसऱ्या आरोपीनेही फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
‘अनफिट’ प्रमाणपत्रांवर प्रश्नचिन्ह…
तपासात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. आरोपींना ‘अनफिट’ प्रमाणपत्र देण्याबाबत डॉक्टर महिलेवर दबाव टाकल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. या संदर्भात पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सविस्तर माहिती दिली होती.
स्वतंत्र न्यायिक चौकशी सुरू
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी स्वतंत्र न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, पोलीस तपास महिला IPS अधिकाऱ्याकडे असून तपास जलदगतीने सुरू आहे. “लवकरच आरोपपत्र दाखल होईल आणि संपूर्ण सत्य उजेडात येईल,” असे त्यांनी आश्वासन दिले.
