MaharashtraNewsUpdate : विनोदाचा बादशहा अशोक सराफ यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित…

मुंबई : यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ सिने अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर करण्यात आला आहे. कला क्षेत्रातील योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले.
गेल्या पाच दशकांपासून अशोक सराफ मराठा रसिकांच्या मनावर राज्य करीत आहेत . त्यांनी अनेक मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटांमध्येही काम केलेले आहे. आपल्या दमदार अभिनयाने आजवर त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. त्यांनी आजवर २५० हून अधिक हिट मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातले अनेक चित्रपट हे सुपरहिट ठरले आहेत. त्यांनी मराठीशिवाय हिंदी, भोजपुरी सिनेमांमध्येही काम केले आहे. हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी आपली छाप सोडली आहे. छोटा पडदा ही त्यांनी गाजवला आहे. ‘हम पाँच’ या हिंदी मालिकेतही त्यांनी काम केले होते.
सिनेसृष्टीचे अशोक मामा…
अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे. सिनेसृष्टीमध्ये त्यांना अशोक मामा म्हणून ओळखले जाते.
९० च्या दशकात अशोक सराफ यांनी आपल्या सहकलाकार असलेल्या निवेदिता जोशी यांच्याबरोबर विवाह केला. निवेदिता जोशी याही त्याकाळी आघाडीच्या अभिनेत्री होत्या. दोघे आजही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. निवेदिता जोशी सध्या मराठी मालिकांमध्ये दिसतात. आई-वडील म्हणजे अशोक-निवेदिता सराफ हे अभिनयातील दिग्गज असूनही मुलगा अनिकेतने मात्र हटके करिअर निवडलेले आहे. अनिकेत हा पेस्ट्री शेफ आहे. त्याचे स्वतःचे एक युट्यूब चॅनलही आहे.
अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी मुंबईतील चिखलवाडी येथे झाला होता. मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणेच अशोक सराफ यांच्या वडिलांना मुलाने शिकून सरकारी नोकरी करावी अशी इच्छा होती. परंतु, अशोक सराफ यांना अभिनयात रस होता. पण तरीही त्यांनी सुमारे १० वर्षे स्टेट बँकेत नोकरी केली. या काळात नोकरी सांभाळत ते आपली अभिनयाची हौस ही भागवत होते.
७०च्या दशकात ते दादा कोंडके, नीळू फुले, अविनाश मसुरेकर, राजा गोसावी यांसारख्या मोठ्या कलाकारांसह काम करताना दिसले. त्यावेळी त्यांनी बहुतेकदा सहाय्यक भूमिका केल्या. पण, १९८० पासून ते चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसले. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे या चौकडीने विनोदाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन पोहचवले. १९७७ साली त्यांना ‘राम राम गंगाराम’ चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तर ‘पांडू हवालदार’ चित्रपटासाठी भारत सरकारने त्यांचा सन्मान केला होता. केवळ मराठीतच नाही तर हिंदी आणि भोजपुरी चित्रपटातही काम करणाऱ्या या अभिनेत्याला ‘मायका बिटुआ’ चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला होता. पांडू हवालदार, सुशीला या चित्रपटातही त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या.
अशोक सराफ यांचे गाजलेले चित्रपट
1. एक डाव भुताचा
2. वजीर
3. धुमधडाका
4. गंमत जंमत
5. आयत्या घरात घरोबा
6. अशीही बनवाबनवी
7. एकापेक्षा एक
8. चंगू मंगू
9. नवरा माझा नवसाचा
10. एक उनाड दिवस
गाजलेले नाटक : हमीदाबाईची कोठी