Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

VBANewsUpdate : महाविकास आघाडीच्या बैठकीत “वंचित ” चे नेमके काय घडले काय बिघडले ?

Spread the love

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज हॉटेल ट्रायडेंट येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्याबाबत चर्चा सुरु आहे. या बैठकीचं निमंत्रण वंचित बहुजन आघाडीलादेखील देण्यात आले होते. या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून पक्षाचे प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर हे गेले. पण बैठक अपूर्ण असतानाच ते बाहेर पडले आहेत. या बैठकीत वंचितला ही वागणूक मिळाल्यामुळे वंचित महाविकास आघाडी इंडिया आघाडीत जाणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता महाविकास आघाडीची पुढील बैठक २ फेब्रुवारीला होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संजय राऊत यांनी वंचितचा आघाडीत प्रवेश झाला असल्याचे x वर ट्विट केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा करण्याकरता महाविकास आघाडीकडून आज नरीमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीलाही आमंत्रण देण्यात आले. त्यानुसार, वंचितचे प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर उपस्थित होते.
महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी घटकपक्ष असल्याचे अधिकृत पत्र द्यावे अशी मागणी धैर्यवर्धन पुंडकर यांनी केली होती. त्यानुसार, ठाकरे गटाचे संजय राऊत, काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या सह्यानिशी महाविकास आघाडीच्या पत्रावर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यात आल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान आमचा बैठकीत अपमान झाला, अशी प्रतिक्रिया पुंडकर यांनी प्रसारमाध्यमांना बैठकीतून बाहेर पडल्यानंतर दिली. “जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत चर्चेसाठी गेल्यानंतर तिथे आम्हाला तुम्ही बाहेर थांबा असे सांगण्यात आले. त्यानंतर आम्हाला तब्बल एक तास बाहेर ठेवले. आम्ही महाविकास आघाडीचे घटकपक्ष आहोत की नाही?”, असा सवाल धैर्यवर्धन पुंडकर यांनी उपस्थित केला आहे.

“मनोज जरांगे पाटील आणि ओबीसींच्या आंदोलनाबाबत भूमिका घ्या, संदिग्ध राहू नका. तुमचा काही फॉर्म्युला ठरला असेल तर तो फॉर्म्युला आम्हाला सांगा. त्यांचं आपापसात काही ठरलेले नाही. त्यांचा आपापसात ताळमेळ नाही. त्यांचंच काही ठरलेलं नसल्यामुळे त्यांनी आम्हाला काही सांगितलेले नाही. आम्ही सुरुवातीला एक-दीड तास बैठकीला बसलो. आम्ही त्यांना सांगितले की या-या विषयांवर तुम्ही भूमिका मांडा. तसेच महाविकास आघाडीमध्ये आधी आम्हाला घ्या. आम्हाला तसं पत्र द्या. त्यावर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही विचार करतो. पण तेव्हापासून आम्ही बाहेर बसलो आहोत”, अशी प्रतिक्रिया धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिली.

‘आम्ही त्यांच्याकडून फॉर्म्युला मागितला’

“आम्ही सीट मागितलेल्या नाहीयत. त्यांच्याकडून फॉर्म्युला मागितला आहे. तुमचं पहिले ठरल्यानंतर आम्हाला सांगा. त्यानंतर आम्ही बोलू. आम्ही बैठकीच्या बाहेर असल्यामुळे त्यांना जातो असं सांगून आलेलो नाही. पण ही वागणूक योग्य नाही. त्यांच्याकडून अपमानास्पदच वागणूक मिळाली आहे म्हणून मी तुमच्यासमोर आलो आहे. आम्ही निर्णय घ्यायला सक्षम आहोत. आम्ही वर्षानुवर्षे रस्त्यावर भांडणारे लोकं आहोत”, असे पुंडकर म्हणाले.

“चर्चेची दारे बंद झाली असे आम्ही म्हणत नाहीत. आम्ही पक्षस्तरावर चर्चा करु. आमचे सीट शेअरिंगबद्दल त्यांनी त्यांचा फॉर्म्युला ठरला असेल तर सांगावा. नसेल तर आमचा १२-१२-१२-१२ चा फॉर्म्युला मान्य करावा. त्यांचेच ठरत नाही. त्यांच्यात भांडणं सुरु आहे. हे ठरलेले आहे. आपल्याला कुणी कशी वागणूक दिली तर त्याबाबत पक्षस्तरावर योग्य निर्णय घेतला जाईल”, अशी सूचक प्रतिक्रिया पुंडकर यांनी दिली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पोस्ट

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत सामील होण्याकरता वंचित बहुजन आघाडीकडून इच्छा व्यक्त केली जात होती. भाजपाविरोधात आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचे म्हणणे होते. परंतु, महाविकास आघाडीतील इतर घटकपक्षांबरोबर वंचितचे असलेले राजकीय मतभेद पाहता हे गणित जुळून येणे कठीण होते. परंतु, आज (३० जानेवारी) वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करून घेतले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भातील पोस्ट एक्सवर केली आहे.

पत्रात काय म्हटलं आहे?

“देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकूमशाहीकडे जातो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान संविधान दिले. व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाहीचा पुरस्कार केला. आज हे सर्व पायदळी तुडवले जाते आहे. २०२४ साली देशात झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तर बहुदा ही शेवटचीच निवडणूक ठरेल, अशी शंका लोकांना वाटते. ही परिस्थिती बदलून राज्यात व देशात परिवर्तन घडवावे, यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली, हे आपण जाणताच. आपण स्वतः देशातील हुकूमशाही विरुद्ध लढत आहात. आम्ही त्याबद्दल आपले आभारी आहोत. वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामिल व्हावे”, अशी आमची भूमिका आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

वंचितचा आघाडीत प्रवेश जाहीर …

“३० जानेवारी रोजी मुंबई येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या सुचनेनुसार, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामिल व्हावे, यावर शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे”, असे या पत्राद्वारे जाहीर करण्यात आले आहे. याबाबत संजय राऊतांनी एक्सवर पोस्ट करून २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडी पक्ष सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलं. वंचितमुळे देशातील हुकूमशाहीविरोधातील लढ्याला बळ मिळेल. भारताचे संविधान धोक्यात आहे. एकत्र येऊन संविधान वाचवावं लागेल, असंही संजय राऊत म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!