Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabaadFireNewsUpdate : धक्कादायक !! औरंगाबादेतील कारखान्यात भीषण अग्नितांडव , सहा कामगारांचा होरपळून मृत्यू

Spread the love

औरंगाबाद : येथील वाळूज औद्योगिक वसाहतीत हातमोजे आणि रबरशी संबंधित साहित्य तयार करणाऱ्या सनशाइन या कंपनीला मध्यरात्री लागलेल्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. या दुर्घटनेतून आठ कामगारांना वाचवण्यात यश आले असून त्यातील तीन ते चार जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व कामगार रात्रीच्या वेळी कारखान्यात झोपलेले असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. मावळत्या वर्षातील ही मोठी दुर्घटना आहे. 

ही भीषण आग नेमकी कशाने लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी औद्योगिक वसाहतीतील हातमोजे आणि रबरचे साहित्य तयार करणाऱ्या कंपनीचे नाव सनशाइन एंटरप्राइजेस असल्याचे कळते. वाळूज एमआयडीसीमध्ये असलेल्या या कंपनीत २० ते २५ कामगार काम करतात. यापैकी १० कामगार हे रात्रीच्या वेळी कंपनीतच राहायचे. यापैकी चार कामगारांनी स्वतःची सुटका करून घेतली मात्र इतर कामगारांना बाहेर पडता आले नाही.

या घटनेची माहिती मिळताच अग्रिशमन दल तात्काल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. सकाळी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.पदमपुरा अग्निशमन दलाचे कर्तव्यावर असलेले अधिकारी वैभव बाकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीतील मुश्ताक शेख (६५), कौसर शेख (७२), इकबाल शेख (१८), ललनची (५५), रियाज भाई (३२), मरगुब शेख (३३, सर्व रा. बिहार) यांचा या घटनेमध्ये मृत्यू झाला. तर दिलीप कुमार लुटकन पठाण, सुशाशिष हलहार, हैदर शेख, अफरोज शेख, मिसबा ऊल शेख, दिलाहत शेख व हसन शेख या आठ जखमींना अग्निशमन दलातील विनायक कदम व सहकार्‍यांच्या पथकाने बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) हलवण्यात आल्याची माहिती वैभव बाकडे यांनी दिली.

अग्निशमन दलाचे अधिकारी मोहन मुंगसे यांनी सांगितले की, आम्हाला मध्यरात्री २.१५ वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. आम्ही जेव्हा घटनास्थळी पोहोचलो तेव्हा संबंध कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला होता. स्थानिकांनी सांगितले की, सहा लोक आतमध्ये अडकले आहेत. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवत आम्ही आतमधून सहा जणांचे मृतदेह बाहेर काढले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!