IndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ८ रेल्वे गाड्यांचे लोकार्पण ..

अयोध्या : पंतप्रधान मोदी यांनी आज अयोध्या दौऱ्यावर असून सुमारे १६ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची घोषणा करीत अनेक प्रकल्पाला भेटी दिल्या. या दौऱ्यात त्यांनी शनिवारी आज पुनर्विकसित रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आला होता. रोड शो नंतर मोदींनी रेल्वे स्थानकाला भेट दिली. तसेच वंदे भारत आणि अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान मोदींनी आज एकूण ८ रेल्वे गाड्या भारतातील राज्यांना दिल्या. यात ६ वंदे भारत, २ अमृत भारत रेल्वेंचा समावेश आहे. या सर्व गाड्यांना त्यांनी हिरवा झेंडा दाखवला.
यामध्ये अयोध्या-दरभंगा आणि मालदा टाउन-बंगळुरू दरम्यान २ अमृत भारत रेल्वे तर अयोध्या-आनंद विहार टर्मिनल, मंगळुरू-मडगाव, जालना-मुंबई, श्री माता वैष्णोदेवी कटरा-नवी दिल्ली, अमृतसर-नवी दिल्ली, कोईम्बतूर-बंगलोर दरम्यान ६ वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी मंगळुरू-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. या एक्सप्रेसमुळे कर्नाटक, केरळ आणि गोव्यातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी मदत होणार आहे. या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसमुळे पर्यटकांसोबतच या शहरांमध्ये प्रवास करणारे व्यावसायिक, विद्यार्थी, आयटी प्रोफेश्नलना यांना सोयिस्कर पडणार आहे. रेल्वेने ट्विटरवर या नव्या वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक शेअर केले आहे.
जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस
CSMT-जालना-CSMT वंदे भारत ट्रेन (20706/20705) बुधवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावेल. ट्रेन क्रमांक 20706 सीएसएमटी येथून दुपारी 1.10 वाजता सुटेल. ही गाडी जालना रेल्वे स्थानकावर रात्री 08.30 वाजता पोहोचेल. तर क्रमांक 20705 वंदे भारत एक्सप्रेस जालना येथून पहाटे 5 वाजता सुटेल. ही गाडी सकाळी 11.55 वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकावर पोहोचेल. ही एक्सप्रेस औरंगाबाद, मनमाड जंक्शन, नाशिक रोड, कल्याण जंक्शन, ठाणे, दादर या स्थानकांवर थांबेल.