Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मनोज जरांगे यांचे भुजबळ यांच्यावर पुन्हा टीकास्त्र , छगन भुजबळ हे पनवती, त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल…

Spread the love

जालना :  छगन भुजबळ हे पनवती असून, त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल अशा शब्दात जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे  शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, मंत्री छगन भुजबळ  आज नाशिक   जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहे. दरम्यान, भुजबळ यांच्या याच पाहणी दौऱ्याला मराठा आंदोलकांचा विरोध करण्यात येत आहे. तर, या सर्व घडामोडीवर मनोज जरांगे  यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, “छगन भुजबळ पनवती आहे. उगाच शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल. जो माणूस पायदळी कायदा तुडवतो, महापुरुषांच्या जाती काढतो, जो शेतकऱ्यांच्या लेकरांच्या विरोधात आरक्षण देऊ नका म्हणून बोंबलतो, घटनेच्या पदावर बसून जातीमध्ये तेढ निर्माण करतो, त्यामुळे त्याने शेतात जायला नको पाहिजे. उगाच त्या जमीनवाल्या शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल. हा माणूस पनवती असल्यासारखा आहे. तसेच, मंत्री गेल्यावरच शेतकऱ्यांचं चांगलं होतं असे काही नाही. प्रशासन आहे ना, प्रशासनाने पंचनामे करायला पाहिजेत. हा माणूस तिथे जाऊन पंचनामे करतो का? आणखी शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्याची शेती तुडवतो, असेही जरांगे म्हणाले.

भुजबळांचा नुकसानग्रस्त भागाचा दौरा

दरम्यान मंत्री छगन भुजबळ  आज नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात झालेल्या नुकसानीची त्यांच्याकडून पाहणी करण्यात येत आहे. ज्यात, येवला तालुक्यातील कातरणी, सोमठा, निळखेडा गावात जाऊन पाहणी करणार आहे. सोबतच, निफाड तालुक्यातील वेळापूर, पिंपळगाव, वनसगव, थेटाळे गावात देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भुजबळ पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे.

भुजबळांना मराठा आंदोलकांचा विरोध…

भुजबळांच्या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केला आहे. आमच्या शेतीचा सातबारा आमच्या बापाच्या नावावर आहे . आम्ही नुकसान सोसू पण तुम्ही बांधावर येऊ नका, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. तसंच शासन दरबारी भांडून आम्हाला निधी उपलब्ध करुन द्या, पण आमच्या बांधावर येण्याचा अट्टाहास का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. इतकंच नाही तर सोमठानदेश गावात भुजबळ गो बॅकच्या घोषणा देखील देण्यात आल्या. त्यांच्या दौऱ्याला विरोध करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर, भुजबळ गेलेल्या रस्त्यावर गोमूत्र शिंपून शुद्ध करण्यात आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!