AurangabaadNewsUpdate : औरंगाबाद शहरात २०० आयकर अधिकाऱ्यांकडून बड्या बांधकाम व्यावसायिकांवर धाडी …

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात एकाचवेळी आयकर विभागाच्या २०० अधिकाऱ्यांनी ११ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही माहिन्यापासून शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे लक्ष आहे त्यातुनाच ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशासह महाराष्ट्रात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडसत्र सुरू केलं आहे. अनेक बडे उद्योगपती तसेच बांधकाम व्यावसायिकांवर छापेमारी केली जात आहे. बुधवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास औरंगाबाद शहरातील ११ ठिकाणी आयकर विभागाने एकाच वेळी धाडी टाकल्या.
दरम्यान, आयकर विभागाने सुरू केलेली ही छापेमारी पुढील दोन ते तीन दिवस चालणार असल्याने ज्यांच्यावर या धाडी टाकण्यात आल्या त्याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. उपलब्ध माहितीनुसार नाशिक आणि पुणे आयकर विभागाच्या टीमने ही छापेमारी केल्याची माहिती आहे. शहरातील बडे बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे समजते. या व्यावसायिकांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी आयकर विभागाचे अधिकारी अधिक चौकशी करीत असल्याचे वृत्त आहे.