Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NaandedMedicalDeathUpdate : रुग्णालयाच्या अधिष्ठातांसह बालरोग विभागातील डॉक्टरवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा

Spread the love

नांदेड : येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी याच रुग्णालयात २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यात १२ बालकांचा देखील समावेश होता. दरम्यान, यावेळी बालकासह तिच्या मातेचा मृत्यू झाल्याची घटना देखील समोर आली होती. तर, नांदेडच्या कंधार तालुक्यातील कुरुळा येथील मायलेकाच्या मृत्यू प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान उच्च न्यायालयानेही याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेत बुधवारी स्वयंप्रेरणेने जनहित याचिका दाखल करून घेतली. या मृत्यूंसाठी डॉक्टर, औषधांचा तुटवडा वा खाटांची कमतरता अशी कारणे दिली जात असतील तर ती मान्य नाहीत, अशा शब्दांत फटकारत न्यायालयाने राज्य सरकारकडून तपशिलात माहिती मागितली आहे. आता, याप्रकरणात नांदेड रुग्णालयाचे डीन डॉ. एस.आर. वाकोडे यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासदार हेमंत पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटी

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेचे धिंदवडे निघाले आहेत. याप्रकरणी शासनाने दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यातच, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कामाजी टोम्पे यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, डॉ. वाकोडे यांना टॉयलेट साफ करण्यास भाग पाडल्याने खासदार हेमंत पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटी व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता, डॉ. वाकोडेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.

रुग्णाचे नातेवाईक कामाजी टोम्पे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, नातेवाईक रुग्णालयात दाखल असताना बाहेरुन ४५ हजारांहून अधिकची औषधी खरेदी करण्यास त्यांनी भाग पाडले. तसेच रक्त व इतर तपासण्यासाठीही पैसे खर्च करण्यात आले होते. तरीही अधिष्ठाता डॉ. एस. आर.वाकोडे आणि बालरोग विभागातील डॉक्टर यांनी जाणीवपूर्वक उपचाराकडे दुर्लक्ष केले. डॉक्टर उपलब्ध करून दिले नाहीत. त्यामुळे माय-लेकाचा मृत्यू झाल्याची तक्रार कामाजी टोम्पे यांनी केली आहे. त्यानुसार, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २२ वर्षीय अंजली वाघमारे या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी तिची प्रसूती झाली. महिलेची नैसर्गिक प्रसुती होऊन तिने मुलीला जन्म दिला. मात्र, शनिवारीच नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यांनतर, महिलेची देखील प्रकृती बिघडत गेली आणि तिचाही मृत्यू झाला. त्यामुळे, संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयातच आक्रोश केला.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!