Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathaReservationNewsUpdate : मराठा आरक्षणासाठी आज मुंबईत सर्वपक्षीय बैठक, मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम

Spread the love

मुंबई : निजामकालीन वंशावळीची अट रद्द करून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी दिलेली ४ दिवसांची मुदत संपताच उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी सलाइन काढले तसेच पाणी पिणेही बंद केले आहे. इकडे, मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठी सोमवारी सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख – प्रतिनिधींची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली आहे. ही बैठक सह्याद्री अतिथीगृहात होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पुण्यात दिली.

आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे आक्रमक होताना पाहावयास मिळत आहेत. आधीच जरांगे यांचा रक्तदाब कमी झाला होता. तसेच त्यांच्या किडनीवरदेखील परिणाम होत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले. त्यामुळे पाणी न घेणे आणि उपचारासाठी नकार देण्याच्या भूमिकेमुळे प्रकृतीवर परिणाम हाेऊ शकतो. जरांगे यांच्या या निर्णयामुळे सरकारची डाेकेदुखी वाढली आहे.

सरकार मराठा समाजाच्या पाठीशी

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सह्याद्री अतिथिगृहात होणाऱ्या या बैठकीला सत्ताधारी शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच राज्यातील सर्व प्रमुख पक्षांना बोलावले आहे. सर्वपक्षीयांच्या बैठकीपूर्वी रात्रभर गोरगरिबांच्या मुलांचे आयुष्य डोळ्यासमोर आणावे. सर्वपक्षीयांनी योग्य मार्ग काढावा, अशी साद उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी घातली आहे.

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधला. शासन कुणालाही फसवणार नाही. टिकणारं आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. सरकार मराठा समाजाच्या पाठीशी आहे. घाईगडबडीत कोणाताही निर्णय घेणार नाही, असं स्पष्टीकरणही एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिलं. आज त्यामुळेच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे, असं एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितले.

आज या सर्वपक्षीय बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह इथे साडेसात वाजता ही बैठक पार पडणार आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि इतर सर्व सदस्य उपस्थित असतील.

या सर्वपक्षीय बैठकीला अशोक चव्हाण, अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, उदयनराजे भोसले , नाना पटोले, बाळासाहेब थोरात,जयंत पाटील , राजेश टोपे, चंद्रशेखर बावनकुळे ,जयंत पाटील , हितेंद्र ठाकूर, कपिल पाटील, विनय कोरे, महादेव जानकर ,बच्चू कडू , राजू पाटील, रवी राणा, विनोद निकोले , संभाजी राजे भोसले, प्रकाश आंबेडकर सदाभाऊ खोत जोगेंद्र कवाडे , राजेंद्र गवई, मुख्य सचिव प्रधान सचिव , विधी व न्याय विभाग यांची उपस्थिती राहणार आहे.

वैद्यकीय उपचार घेण्यास नकार

दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गत १४ दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी वैद्यकीय उपचारासाठी आलेल्या वैद्याकीय पथकाकडून जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला. मराठा आरक्षणाचा जीआर आल्यानंतरच तपासणी करून उपचार घेणार असल्याची भूमिका जरांगे यांनी घेतली.

जरांगे यांच्या शिष्टमंडळाने शासनासमवेत चर्चेच्या तीने फेऱ्या केल्या परंतु त्या अयशस्वी झाल्या असून, रविवारी सकाळपासून जरांगे यांनी पाणी पिणे, उपचार घेणे बंद केले आहे. रविवारी दुपारी व रात्री त्यांनी तपासणी करु दिली नाही. त्यामुळे त्यांची शुगर, बिपी तपासता आले नाहीत. डॉक्टरांनी रविवारीही दोन वेळेस विनवणी केली. मात्र जरांगे यांनी तपासणी व उपचार घेण्यास नकार दिला. वैद्यकीय पथक सोमवारी सकाळी वैद्यकीय पथक १०:४० वाजता उपोषणस्थळी आले होते. पथकातील डॉ. अतुल तांदळे यांनी बीपी, शुगर सह इतर तपासण्या करू द्या, अशी जवळपास अर्धा तास विनवनी केली. परंतु, जरांगे यांनी तपासणी, उपचारालाही नकार दिला.

मनोज जरांगे यांचे समाजाला आवाहन

माझे आमरण उपोषण सुरूच राहणार आहे. सरकारच्या सांगण्यावरून आतापर्यंत उपचार आणि पाणी घेत होतो. पण त्यांना दिलेल्या ४ दिवसांचा वेळ पूर्ण झाला आहे. उपचाराचादेखील त्याग केला आहे. सोबतच सरकारसोबत आता चर्चेसाठी जायचं की नाही याबाबतीत आम्ही आमची एक बैठक घेणार आहोत. त्यात पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. ग्रामस्थांनी या ठिकाणी न येता गावागावात आरक्षणाची माहिती रॅलीच्या माध्यमातून पटवून द्यावी. या दरम्यान जनजागृतीही करावी, असे आवाहन जरांगे यांनी केले.

आंदाेलनाची धग कायम , आंदोलन चालूच

मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दाखल घेतली जात नसल्याने त्यांनी केलेल्या विविध मागण्या पूर्ण हाेत नसल्याने सोमवारी जालना जिल्ह्यात ठिय्या, तर येत्या १६ सप्टेंबर रोजी मराठवाडाभर चक्का जाम आंदोलन हाेणार आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात निपाणी गावातील १५० वर तरुण मुंडण केले परतूर तालुक्यातील सावरगाव बु. येथेही ५१ मराठा समाजातील तरुणांनी मुंडण केले. तर रविवारी बीड तालुक्यातील कुटेवाडी येथे एका युवकाने अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला, तर गेवराई तालुक्यातील दैठणमध्ये २० युवक पाण्याच्या टाकीवर चढले.

अंगात छर्रे घुसलेल्या दाेघांना मुंबईला हलवले

दरम्यान आंतरवाली सराटी येथे उपाेषणावेळी पाेलिसांनी लाठीचार्ज व गाेळीबार केला. यात दोन जणांच्या अंगात छर्रे घुसले आहेत. एका जणावर खासगी तर एका जणावर औरंगाबाद येथील घाटीत उपचार सुरू होते. दरम्यान, या दोघांच्याही शरीरातील संपूर्ण छर्रे काढता आले नाहीत. या दोघांनाही मुंबईतील लीलावती हाॅस्पिटलमध्ये हलवण्यात आले. आकाश श्रीमंत कवडे (२३, रेणापुरी, ता. अंबड), शरद सुखदेव नरवडे‌ (२७, बळेगव, ता. अंबड) मुंबईला हलवण्यात आलेल्यांची नावे आहेत. आकाश कवडे यांचे दोन्ही खांदे, डोके व पोटात असे सात छर्रे घुसले आहेत. यातील दोन छर्रे औरंगाबाद येथे काढण्यात आले, तर शरद नरवडे‌ यांच्या शरीरातील पाच छर्रे काढण्यात आले. इतर छर्रे मुंबईत काढले जातील.

आमदार बंब यांना भेटू देण्यास मज्जाव

मराठा आरक्षणासाठी गेल्या आठ दिवसांपासून कायगाव येथील स्व.काकासाहेब शिंदे स्मारकाजवळ उपोषणास बसलेले शिवबा संघटनेचे संपर्कप्रमुख देविदास पाठे पाटील यांची तब्येत रविवारी दुपारी खालावली. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गंगापूरचे आमदार प्रशांत बंब हे पाठे यांना भेटण्यासाठी आले होते. परंतु त्या वेळी संतप्त कार्यकर्त्यांनी आमदार बंब यांना देविदास पाठे यांना भेटू दिले नाही. ‘जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एकाही लोकप्रतिनिधीने आम्हाला भेटू नये. तुमच्या सांत्वनाची आम्हाला गरज नाही. तुम्ही परत जा,’ असे म्हणत आमदार प्रशांत बंब यांना खडेबोल सुनावत माघारी पाठवले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!