रवींद्र महाजनी नावाचा मराठी चित्रपटसृष्टीचा तारा निखळला …
मुंबई : प्रासिध्द ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले असल्याचे वृत्त आहे. पुण्यातील तळेगाव आंबी एमआयडीसी येथील त्यांच्या घरात त्यांचा मृतदेह आढळला. रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूपश्चात त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी , सून आणि नातू आहेत. महाजनी यांचा मुलगा गश्मीर महाजनी हा देखील प्रसिद्ध अभिनेता असून सध्या हिंदी टेलिव्हिजनवर काम करत आहे.
रवींद्र महाजनी यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगा गश्मीर महाजनी देखील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यांची मुलगी आजवर कधी समोर आलेली नाही. रवींद्र महाजनी हे मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. अभिनय क्षेत्रात काम करत असताना ते टॅक्सी चालक म्हणून काम करत होते. रवींद्र महाजनी हे मध्यवर्गीय कुटुंबातील होते. अभिनयाच्या जोडीला उत्पन्नाचं साधन म्हणून त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला होता. मात्र त्यात त्यांची फसवणूक झाली आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. या वेळेस त्यांची दोन्ही मुलं मोठी होत होती. गश्मीर महाजनी त्या काळात शिक्षण घेत होता. पण कर्जात बुडालेल्या वडिलांना आणि घराला गश्मीरने सावरलं होतं. रवींद्र महाजनी यांनी एकेकाळी फसवणूक, कर्ज अशा संकंटांचा सामना केला आहे.
पत्नी मुलगा गश्मीरबरोबर राहायची …
एका मुलाखतीत गश्मीरने सांगितलं, वयाच्या १५ व्या वर्षी पुण्यात स्वत:ची डान्स अकॅडमी सुरू केली. त्यावेळेस आम्ही आर्थिक संकटात होतो. आमचं घर बँकेत गहाण होतं. ४०-५० लाखांचं कर्ज होतं. डान्स अकॅडमीनंतर २ वर्षांनी स्वत:ची कार्पोरेट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी स्थापन केली. त्यातून पॅन इंडिया इव्हेंट्स करायचो. २१ व्या वर्षी ५-६वर्षात आम्ही ४०-५० लाखांचं कर्ज फेडले. आमचं घर सोडवलं. १७ व्या वर्षी मी इनकम टॅक्स फाइल करायचो.
गश्मीरचं त्याच्या आईबरोबर फार जिव्हाळ्याचं नातं आहे. गश्मीरची आई त्याच्याबरोबर मुंबईत राहते. तर रवींद्र महाजनी मागील ८-९ महिन्यांपासून तळेगाव येथे भाड्याच्या घरात राहात होते. गश्मीर महाजनी सोशल मीडियावर सक्रीय असतो. अनेक रिअलिटी शोमध्ये काम करत असतो. तिथे प्रत्येक वेळी त्याची आई त्याच्याबरोबर असते. सोशल मीडियावरही गश्मीर आईबरोबरचे फोटो शेअर करतो. वडिलांचा कोणताही उल्लेख त्याच्या सोशल मीडियावर पाहायला मिळत नाही.
बापलेकाची जोडी एकत्र
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या सिनेमात रवींद्र महाजनी आणि गश्मीर महाजनी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या सिनेमामुळं या बाप लेकाच्या जोडीला एकत्र काम करता आलं. त्याचप्रमाणे देऊळ बंद या मराठी सिनेमातही बापलेकाची जोडी एकत्र पाहायला मिळाली होती. १९७५ ते १९९० या काळात मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टी गाजवणारे ते प्रसिध्द अभिनेते होते. मावळ तालुक्यातील आंबे येथे वास्तव्यास होते. शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील सदनिकेत ते मृतावस्थेत सापडले. महाजनी हे गेल्या काही महिन्यांपासून ते येथील एका सदनिकेत भाडेतत्वावर राहत होते.
तळेगाव एमआयडीसीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत यांनी सांगितलं की, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार महाजनी यांचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा. गेल्या आठ महिन्यांपासून ते एकटेच या घरात राहत होते. पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. आमच्या टीमने दरवाजा तोडला आणि फ्लॅटमध्ये महाजनी मृतावस्थेत आढळले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव दाभाडे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे,” असंही ते म्हणाले. ‘
रवींद्र हणमंत महाजनी यांचा कलाप्रवास…
खालसा महाविद्यालयामध्ये बी.ए. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवींद्र महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत नशीब अजमावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मधुसूदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून महाजनींना खऱ्या अर्थाने पहिली संधी मिळाली. शांतारामबापूंनी या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि रवींद्र महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी दिली. १९७४ साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजनी नावाचा नवा तारा मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला.
शांतारामबापूंनी या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि रवींद्र महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी मिळाली. १९७४ साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजनी नावाचा नवा तारा मराठी चित्रपट सृष्टीला मिळाला होता.
रवींद्र महाजनी यांचे चित्रपट
आराम हराम आहे
लक्ष्मी
लक्ष्मीची पावलं
देवता
गोंधळात गोंधळ
मुंबईचा फौजदार
बेलभंडार
अपराध मीच केला
काय राव तुम्ही
कॅरी ऑन मराठा
देऊळ बंद
पानिपत
अशोक सराफ यांची प्रतिक्रिया
मराठी चित्रपटसृष्टीने एक देखणा नट गमावला, असे अशोक सराफ यांनी यांनी म्हटले आहे . “खूप वाईट घडलंय. आमच्या पिढीतला एकमेव देखणा नट गेला, असं मला वाटतं. तो हिरो आणि मी साईडला असे बरेच चित्रपट आम्ही एकत्र केलेत. आम्ही यशस्वी चित्रपट केले आहेत. एक चांगला माणूस, एक चांगला मित्र गेल्याने खूप दुःख होतंय. एक चांगला नट, मित्र गमावल्याचं दुःख मनात कायम राहील. नेहमी हसत खेळत वावरणारा, हसमुख चेहऱ्याचा नट होता. प्रामाणिकपणा हा त्याच्यातला सर्वात मोठा गुण होता, तो प्रत्येक भूमिका उत्तम करायचा. जे करायचा ते मन लावून करायचा, त्यामुळे तो त्या काळातला एक यशस्वी नट होता.”