Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Cabinet Ministers Update : जाणून घ्या कोणाकडे कोणते खाते ? भाजप , सेनेचे कोणते खाते गेले ?

Spread the love

मुंबई : गेल्या अनेक दिवसांच्या घडामोडींनंतर आमी चर्चेनंतर अखेर शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. या खातेवाटपात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडे असलेली काही खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना देण्यात आली. शिवसेना शिंदे गटातील स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, दादा भुसे आणि संजय राठोड यांच्याकडील एकेक खाते कमी करण्यात आले असून, ते खाते राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले आहे.

शिवसेना शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषी खाते होते. मात्र, यावरून आरोप-प्रत्यारोप झाले होते. यानंतर आता अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्यात आले असून, या खात्याचा कार्यभार आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आला आहे. यानंतर अब्दुल सत्तार यांच्याकडे आता अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन ही खाती आहेत. दुसरीकडे, दादा भुसे यांच्याकडे असलेला बंदरे हा विभाग आता राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे यांना देण्यात आला आहे. नवीन खातेवाटपानंतर आता दादा भुसे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाते आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील कोणती खाती राष्ट्रवादीला?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील काही खाती राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहेत. यामध्ये विशेष सहाय्य विभाग हा हसन मुश्रीफ यांना देण्यात आला आहे. तसेच मदत पुनर्वसन खाते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल पाटील यांना देण्यात आले आहे.

नवीन खातेवाटपानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय ही खाती राहिली आहेत. तसेच संजय राठोड यांच्याकडे असलेले अन्न व औषधी खाते राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मराव अत्राम यांना देण्यात आले आहे. यानंतर संजय राठोड यांच्याकडे आता, मृद व जलसंधारण खाते राहिले आहे.

भाजपकडे असलेली खातीही राष्ट्रवादी काँग्रेसला दिली

उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले अर्थ व नियोजन खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती आहेत. तर, रवींद्र चव्हाण यांच्याकडे असलेले अन्न नागरी पुरवठा खाते छगन भुजबळ यांना देण्यात आले आहे. यानंतर आता रवींद्र चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खाते आहे.

दरम्यान, अतुल सावे यांच्याकडे असलेले सहकार खाते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आले आहे. यानंतर आता अतुल सावे यांच्याकडे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण ही खाती आहेत. तर, मंगलप्रभात लोढा यांच्याकडे असलेले महिला व बाल कल्याण खाते हे अदिती तटकरे यांना देण्यात आले आहे.

मंगलप्रभात लोढा यांच्याकडे आता कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता अशी खाती आहेत. विशेष म्हणजे गिरीश महाजन यांच्याकडे असलेली दोन खाती राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहेत. क्रीडा आणि वैद्यकीय शिक्षण ही खाती अनुक्रमे संजय बनसोडे आणि हसन मुश्रीफ यांना देण्यात आली आहेत. आता गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन ही खाती आहेत.

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

दृष्टीक्षेपात मंत्री नवे मंडळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार.

उपमुख्यमंत्री अजित पवार : यांच्याकडे वित्त व नियोजन.

इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:

छगन भुजबळ : अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील : सहकार
राधाकृष्ण विखे-पाटील : महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार : वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
हसन मियाँलाल मुश्रीफ : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
चंद्रकांतदादा बच्चू पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार कृष्णराव गावित : आदिवासी विकास
गिरीष दत्तात्रय महाजन : ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा व स्वच्छता
दादाजी दगडू भुसे : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
संजय दुलिचंद राठोड : मृद व जलसंधारण
धनंजय पंडितराव मुंडे : कृषि
सुरेशभाऊ दगडू खाडे : कामगार
संदीपान आसाराम भुमरे : रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय रविंद्र सामंत : उद्योग
प्रा.तानाजी जयवंत सावंत : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र दत्तात्रय चव्हाण : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),
अब्दुल सत्तार : अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
दीपक वसंतराव केसरकर : शालेय शिक्षण व मराठी भाषा
धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम : अन्न व औषध प्रशासन
अतुल मोरेश्वर सावे : गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज शिवाजीराव देसाई : राज्य उत्पादन शुल्क
कु. अदिती सुनिल तटकरे : महिला व बालविकास
संजय बाबुराव बनसोडे : क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
अनिल पाटील : मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!