Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : भाजपने टीका न करता , घरात घुसलेल्या बाजार बुणग्यांना सांभाळावे : उद्धव ठाकरे

Spread the love

यवतमाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. सकाळी नागपूरला पोहोचल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. येथून ते पोहोरादेवीकडे रवाना झाले दरम्यान आज यवतमाळमध्ये दाखल झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य करताना “भाजपा आता काहीही बोलण्याच्या लायकीचा राहिलेला नाहीये. भाजपाने आता कोणावरही दोषारोप करण्याचे सोडून द्यावे तसेच त्यांनी त्यांच्या घरात घुसलेल्या बाजार बुणग्यांच्या सांभाळ करावा. दुसऱ्यांवर टीका करत बसू नये” अशी टीका भाजपवर केली.

दरम्यान शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात बोलताना ठाकरे म्हणाले की , सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्ट शब्दांत निकाल दिलेला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना त्या निकालाच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावा लागेल. जर त्यापेक्षा वेगळी गोष्ट घडलीच, तर आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठवू. ”

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ट्विटला उत्तर

उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यावर टीका करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी , “सत्ता असताना अडीच वर्षांत अडीच दिवस मंत्रालयात जाण्यासाठी ज्यांना वेळ मिळाला नाही ते उद्धव ठाकरे आता तब्बल दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना कधीही विदर्भातील जनतेची आठवण झाली नाही; आता मात्र विदर्भाचा पुळका आलेला दिसतोय. सत्तेवर असताना मंदिरं बंद ठेवून मदिरालय सुरू करणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता मंदिरांत दर्शनासाठी जावं लागतंय. उद्धव ठाकरे आता तुम्ही कितीही दौरे केले तरी तुमचं ढोंगी राजकारण आणि सत्ता गेल्यामुळे सुरू असलेली नौटंकी जनता ओळखून आहे. उद्धव ठाकरे तुम्ही विदर्भाच्या दौऱ्यावर आलाच आहात तर भाजपसोबत गद्दारी करून, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व सोडून तुम्हाला काय मिळालं हेही एकदा जनतेला सांगून टाका,” असे ट्वीट केले होते त्याला उद्धव ठाकरे यांनी कडक शब्दात उत्तर दिले.

आधी पक्ष फोडले जात होते. पण आता पक्ष पळवले जात आहेत…

महाराष्ट्र दौऱ्याची सुरूवात पोहरादेवीच्या दर्शनाने करण्यामागे एकच उद्देश आहे की देवीच्या आशीर्वादाने सुरूवात केली जावी. या दौऱ्यामध्ये मी जाहीर सभांचा आग्रह धरलेला नाही. कारण माझा ग्रामीण भागातील शिवसैनिक हा शेतकरी आहे. त्याला आता शेतात राबायचं आहे, त्यामुळे मी फक्त कार्यकर्त्यांचे मेळावे घेणार आहे. दरम्यान अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षाच्या नावावर, चिन्हावर केलेला दावा याबाबत विचारले असता ठाकरे म्हणाले की , आधी पक्ष फोडले जात होते. पण आता पक्ष पळवले जात आहेत. पण माझा पक्ष पळवल्यानंतरही मला लोकांचे समर्थन मिळत आहे. जागोजागी मला लोक पाठिंबा असल्याचे सांगत आहेत. पक्ष पळवणं हा पायंडा महाराष्ट्रासाठी वाईट आहे, पण आम्ही तुमच्या सोबत आहोत असे लोक मला सांगत आहेत, असे ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे या दौऱ्यात विदर्भातील पाच जिल्ह्यांतील शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी ४ वाजता ते कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहे. फुटीनंतर पक्ष मजबूत करण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्यांना आपल्याकडे रोखून धरण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण आहे.

विशेष म्हणजे त्यांच्या आधी पक्षात फूट पडताच शरद पवार यांनी नाशिकमधून आपला महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. तर, उद्धव ठाकरे हे आज विदर्भापासून आपल्या दौऱ्याला सुरूवात करत आहेत. महाराष्ट्राच्या दोन विरोधी टोकांकडून दौऱ्याला सुरूवात करत बंडखोरांविरोधात जनमत निर्माण करण्याचा उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे आज आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात यवतमाळ, वाशीम, अमरावती, अकोला आणि नागपूर या पाच जिल्ह्यांतील शिवसैनिकांशी संवाद साधणार असून प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. या दौऱ्यासाठी विदर्भातील शिवसैनिकांनीही जय्यत तयारी केली आहे. सोमवारी त्यांचा अकोला दौरा आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!