AurangabadNewsUpdate : पोलिसांचे आदेश झुगारून निघाला हिंदू जनगर्जना मोर्चा, घोषणांनी दणाणले शहर , प्राक्षोभक भाषणांनी मोर्चाची सांगता….

औरंगाबाद : पोलिसांनी परवानगी नाकारुनही औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामांतर केल्याच्या समर्थनार्थ आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू जनगर्जना मोर्चा काढण्यात आला . या मोर्चाला क्रांती चौकातून प्रारंभ होऊन औरंगपुऱ्यातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ विसार्जित करण्यात आला. या मोर्चामुळे ऐतिहासिक क्रांती चौकात अक्षरश: भगवे वादळ निर्माण झाले होते. तसेच यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. यात शेकडो आंदोलक सहभागी झाले. दरम्यान औरंगाबाद नामांतराच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याचे वृत्त असून येत्या २४ न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार असल्याचे वृत्त आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ आज (१९) रोजी शहरात सकल हिंदू समाजातर्फे ‘हिंदू जनगर्जना मोर्चा’ काढण्यात आला. शहरातील क्रांती चौक येथून सकाळी साडे अकरा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा तसेच श्रीरामांची प्रतिमा मोर्चात ठेवण्यात आली होती. यावेळी तिरंगी ध्वजासह, भगवे, निळे झेंडे, गळ्यात भगवे रुमाल, डोक्यावर टोपी अन छत्रपती संभाजी महाराज की जय, जय श्रीराम, आमची अस्मिता आमचा अभिमान छत्रपती संभाजीनगर आदी घोषणांनी शहर दणाणून सोडले होते. मोर्चाच्या समारोपप्रसंगी वक्त्यांनी प्रक्षोभक भाषणे केली आणि पोलीस बघत राहिले. अतुल सावे, संदीपान भुमरे, हरिभाऊ बागडे, टी राजा, शिवेंद्रसिंहराजे भोसले आदींची यावेळी उपास्थिती होती.
क्रांती चौक-पैठण गेट या मार्गा ऐवजी हा हिंदू गर्जना मोर्चा क्रांती चौक सतीश मोटर्स विवेकानंद कॉलेज समोर निराळा बाजार मार्गे निघाला. मोर्चा इतका मोठा आहे की, याचे एक टोक औरंगपुऱ्यात तर शेवटचे टोक अजूनही जालना रोडवर आहे. यावेळी औरंगपुरा परिसरात या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी पोलिसांनी जागोजागी बॅरिकेट लावून रस्ते बंद केल्याने वाहन चालक अडकून पडले आहेत. मोर्चासाठी परवानगी मिळण्यासाठी संयोजकांनी १६ मार्च रोजी पोलीस प्रशासनाकडे अर्ज करण्यात आला होता. शनिवारी सायंकाळी पोलीस प्रशासनाने मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याचे पत्र आयोजकांना दिले. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ही परवानगी नाकारण्यात आल्याचे कारण पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलीस प्रशासनाने मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी ठरल्याप्रमाणे मोर्चा काढला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले होते.
लव्ह जिहाद कायदा करण्याची मागणी
या मोर्चात धर्मांतरित हिंदूंना पुन्हा स्वधर्मात येण्यासाठी अर्थसाहाय्य घोषित करा !, गोमातेची कत्तल थांबवा !, आमची अस्मिता आमचा अभिमान छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजी महाराज की जय !, आय लव्ह छत्रपती संभाजीनगर!, जब तक सूरज चांद रहेगा छत्रपती संभाजीनगर नाम रहेगा, आंतरधर्मीय विवाह नोंदणी न्यायालयातच करून ते ‘लव्ह जिहाद’ आहेत का, हे तपासण्याची व्यवस्था करा !, गो हत्या विरोधी कायदा झालाच पाहीजे, अशा आशयाचे इत्यादी फलक झळकवण्यात येत होते.
पोलीस आयुक्तांचे विशेष लक्ष
छत्रपती संभाजीनगर नावाच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजातर्फे आयोजित केलेला माेर्चा व सभेला शहर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता परवानगी नाकारली होती. तरीदेखील मोर्चावर ठाम राहत आयोजकांनी आज मोर्चा काढला. त्यामुळे क्रांती चौक परिसर ते सिल्लेखाना परिसरात पोलिस उपायुक्त, ३३ वरिष्ठ पोलीस अधिकारी व साडे तीनशे पेक्षा जास्त पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. क्रांती चौकपासून मोर्चाच्या पुढे, मागे आणि सोबत पोलीस कर्मचारी होते. या मोर्चात सिव्हिल ड्रेस मध्ये देखील अनेक कर्मचारी सहभागी झाले होते. या मोर्चा वर पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांचे विशेष लक्ष होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्हीच्या माध्यमातून व पोलिसाकडून विशेष दखल घेण्यात आली.
महिलांची लक्षणीय उपस्थिती
या मोर्चामध्ये गळ्यात भगवा रुमाल, डोक्यावर भगवी टोपी, हातात भगवा ध्वज घेत हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. या महिलांनी आपल्या हातात छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ आणि गोहत्या बंदी, लव्ह जिहाद, हिंदू राष्ट्र आदींचे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चा मध्ये सहभागी झालेल्याना पाणी बॉटल, बिस्कीट आदी देण्यात आले होते. दरम्यान यामुळे झालेला कचरा मोर्चेकरानी उचलून घेतला.
सर्वोच्च न्यायालयात याचिका,
औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या शासन निर्णयाच्या विरोधात बॉम्बे हायकोर्टात वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या असतानाच या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे. येत्या २४ रोजी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान मुंबई खंडपीठातील न्या. संजय गंगापुरवाला, न्या. संदीप मारणे यांच्यासमोर आधीची याचिका सुनावणीस निघाली असता खंडपीठाने याचिकाकर्त्यास सुधारित याचिका दाखल करुन, केंद्र आणि राज्य शासनाने आपले म्हणणे २४ मार्चपर्यंत दाखल करावेत असे आदेश दिले. पुढील सुनावणी २७ मार्च रोजी ठेवण्यात आली. तर नामांतरला स्थगिती मिळावी यासाठी याचिकाकर्ते हिशाम उस्मानी, संजय वाघमारे, मुश्ताक अहेमद, अण्णासाहेब खंदारे, राजेश मोरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली!
छत्रपती संभाजीनगर नामांतरण समर्थनार्थसह गोहत्या,लव्ह जिहाद,धर्मांतर विरोधी कायदा या मागणीसाठी सकल हिंदू समाजतार्फे हिंदू जन गर्जना मोर्चा काढण्यात आला होता. विशेष म्हणजे पोलिसांनी मोर्च्याला परवानगी नाकारून सुध्दा शहराबाहेरूनही शेकडो वाहनांव्दारे कार्यकर्ते दाखल झाले होते. पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे जालना रोड, पैठग गेट परिसर, निराला बाजार, मुख्य बसस्थानक, उस्मानपुरा याभागात वाहतुकीची कोंडी झाली होती.
पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही आयोजकांनी मोर्चा काढला होता. मोर्चात १ लाखापर्यंत समर्थक सहभागी होतील असा दावा समितीच्या वतीने करण्यात आला होता. याबाबत पोलिसांना पूर्व कल्पना असून सुध्दा पोलिसांनी योग्य पध्दतीने नियोजन केले नाही हे वाहतूक कोंडीवरून दिसून आले. सर्वत्र वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत होत्या. विशेष म्हणजे मोर्चेकरी आणि त्यांच्या वाहनांमुळे कोंडी झाली होती.
मोर्च्याला परवानगी नव्हती, पोलिसांना बघ्याची भूमिका घेतली…
वाहतुकीच्या कोंडीमुळे पोलीसही पुढे आले नाही. यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला. विविध कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना पोलिसांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसला. कामानित्त बाहेर पडणा-या महिला,विद्यार्थी नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागल्याचे दिसून आले. मोर्च्याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. सकाळपासून बाहेर गावाहून कार्यकर्ते क्रांती चौकाच्या दिशेने वाहनांव्दारे,दुचाकीवर येत होते. त्यांना पोलिसांनी रोखले नाही. त्यामुळे वाहतुक व्यवस्था कोलमडल्याचे चित्र होते. पोलिसांना बघ्याची भूमिका घेतल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला अशीही चर्चा शहरात सुरु झाली आहे.
जन गर्जना मोर्चा मुळे पोलिसाची उडाली तारांबळ
पोलिसानी हिंदू जन गर्जना मोर्चाला परवानगी नाकारल्यावर क्रांतीचौकात आज सकाळी पासूनच नागरिक जमा होऊ लागले होते. तसेच औरंगपुरा येथे समितीतर्फे सभे साठी स्टेज उभारण्यात आला होता. त्यामुळे शहरात सकाळीपासून रविवार असूनही सकाळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस अधिकारण्यांसह कर्मचारी रस्तावर उतरले होते. क्रांतीचौक पासून ते औरंगापुऱ्या पर्यत पोलिसाचा फौंजफाटा तैनात होता. जशी जशी नागरिकांची क्रांतीचौकात गर्दी वाडू लागली, त्यानंतर सर्व वरिष्ठ अधिकारी देखील रस्त्यावर उतरले. स्वतः पोलीस आयुक्त निखिल गुप्ता हे देखील रस्तावर आले. त्यानंतर औरंगपुरा कडे जाणारे सर्व रास्ते पोलिसानी बॅरिकेट टाकून बंद केले, त्यामुळे जालना रोड, अदालत रोड, सिल्लेखाना, समर्थनगर, महावीर चौक मिल कॉर्नर, निरालाबाजार आदी ठिकाणी वाहतुकीची कोडी झाली होती. त्यामुळे पोलिसाची चांगलीच तारबळ उडाली होती.