IndiaNewsUpdate : वृद्ध महिलेवर लघुशंका करून पसार झालेला शंकर मिश्रा अखेर न्यायालयीन कोठडीत …

नवी दिल्ली : न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये एका ७० वर्षीय वृद्ध महिलेवर लघुशंका करून पसार झालेल्या शंकर मिश्राला पोलिसांनी गजाआड करून न्यायालयासमोर हजर केले. दरम्यान दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने मिश्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जानेवारीला होणार आहे.
शंकर मिश्राच्या जामिनावर न्यायालयाने नोटीस बजावली आहे. दिल्ली पोलिसांच्या उच्च सूत्रांनी शनिवारी सांगितले की शंकर मिश्राला पकडण्यासाठी त्यांनी विमानतळावर अलर्ट जारी केला, त्याचा फोन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला आणि बँक व्यवहारांवर लक्ष ठेवले. त्याच्या ठावठिकाण्याबाबत काही ‘ठोस’ लीड मिळाल्यानंतर त्यांनी बेंगळुरूमध्ये एक टीम तैनात केली. त्यानंतरच शुक्रवारी आरोपीला अटक करण्यात आली. २६ नोव्हेंबरला ही घटना घडली होती.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर मिश्राने आपला फोन बंद केला होता, परंतु तो आपल्या मित्रांशी बोलण्यासाठी त्याचे सोशल मीडिया खाते वापरत होता. त्यामुळे त्याचे लोकेशन पोलिसांना मिळाले. त्याच्या क्रेडिट/डेबिट कार्ड वापरण्यावरही पोलिसांचे लक्ष होते तर दुसरीकडे, पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, पोलिस उपायुक्त (विमानतळ) रवी कुमार सिंह यांनी सांगितले की, आरोपी शंकर मिश्रा याला दिल्ली पोलिसांच्या पथकाने बेंगळुरू येथून अटक केली आहे. त्याला दिल्लीत आणण्यात आले असून याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. आरोपी बंगळुरूच्या संजय नगरमध्ये त्याच्या बहिणीच्या घरी लपला होता.
या घटनेनंतर, एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कॅम्पबेल विल्सन यांनी कर्मचार्यांना फ्लाइटमध्ये कोणत्याही अनुचित वर्तनाची त्वरित तक्रार करण्यास सांगितले आहे, जरी असे दिसून आले की प्रकरणाचे निराकरण झाले आहे. एअर इंडियाच्या विमानात लघवीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळानंतर एअरलाइन्स कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या विभागीय मेलमध्ये हे सांगण्यात आले आहे.
गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी आरोपी शंकर मिश्रा याने बिझनेस क्लासमध्ये एका वृद्ध महिला सहप्रवासी महिलेवर मद्यधुंद अवस्थेत तिच्या सीटजवळ जाऊन लघवी केली होती. मिश्रा कॅलिफोर्निया येथील अमेरिकन बहुराष्ट्रीय वित्तीय सेवा कंपनीच्या भारतीय युनिटचा उपाध्यक्ष होता. या घटनेनंतर त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.
पीडितेने एफआयआरमध्ये म्हटले आहे की,
पीडितेने एफआयआरमध्ये म्हटले आहे की, ‘माझे कपडे, शूज आणि बॅग लघवीने भिजली होती. माझा पासपोर्ट, कागदपत्रे आणि पैसे बॅगेत होते. विमान कर्मचार्यांनी त्याला स्पर्श करण्यास नकार दिला, माझी बॅग आणि शूजवर जंतुनाशक फवारले आणि मला बाथरूममध्ये नेले. त्यानंतर मला पायजमा आणि सॉक्सचा एक जोड देण्यात आला. क्रू मेंबर्सनीही आरोपीसोबत चर्चा केली आणि आरोपीला तुमची माफी मागायची असल्याचे सांगितले. परंतु, मी स्पष्टपणे सांगितले की मला त्याच्याशी बोलायचे नाही किंवा त्याचा चेहरा देखील पाहायचा नाही. त्यानंतर माझ्या इच्छेविरुद्ध क्रूने संशयित आरोपीला माझ्यासमोर आणले आणि आम्हाला समोरासमोर बसवले गेले. माझ्यासमोर बसल्यानंतर तो रडू लागला. त्यावेळी मी स्तब्ध झाले. तो माझी माफी मागू लागला, तक्रार न करण्याची विनंती करू लागला. मी त्याला सांगितले की त्याची कृती अक्षम्य आहे.