Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraWeatherUpdate : महाराष्ट्रासह देशभरात थंडीची लाट , उत्तर प्रदेशात १४ जणांचा मृत्यू , उद्यापासून तापमानात मोठी घट

Spread the love

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात थंडीमुळे वातावरणात मोठा बदल होत असून सकाळी आणि रात्री चांगलीच हुडहुडी भरत आहे. दरम्यान ९ जानेवारीनंतर तापमानाचा पारा पुन्हा घसरणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यातील तापमानात २ ते ४अंश सेल्सिअसपर्यंत घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हावामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भातील काही जिल्ह्यात थंडीची लाट येऊ शकते तर पुढील आठवड्यात मुंबईतील तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज आहे.


भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, ९ जानेवारीनंतर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस विदर्भातील काही जिल्ह्यात थंडीची लाट पाहायला मिळेल. आज आणि उद्या नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यात थंटीच्या लाटेचा अंदाज आहे. गोंदियामध्ये चार दिवसांपासून तापमानात घट झालेली आहे. आज गोंदिया जिल्हाचा पारा ७ अंशावर पोहोचला असून विदर्भात सर्वात कमी तापमान असल्याची नोंद करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि मराठवाड्यातील औरंगाबाद तसंच जालन्यातही ९ जानेवारीनंतर एक अंकी तापमानाची शक्यता आहे. तर एरव्ही घामाच्या धारांमध्ये भिजलेले मुंबईकर सध्या थंडीचा अनुभव घेत आहेत. परंतु पुढील आठवड्यात १३ आणि १४ जानेवारीच्या दरम्यान मुंबईतील तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे. मुंबईचे किमान तापमान १५अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याचा अंदाज आहे.

दरम्यान बदलत्या हवामानामुळे रब्बी पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. तर, गारठा वाढल्याने फुलकोबी पिकांवर अडींचा प्रादुर्भाव दिसून येत असून कोबी पिवळी पडू लागली आहे.

उत्तर प्रदेशात १४ जणांचा मृत्यू

महाराष्ट्राबरोबरच देशातील अनेक भागात कडाक्याची थंडी पडली आहे. थंडी आणि धुक्यामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष उत्तर भारतात थंडीचा जोर अधिक वाढला आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये थंडीमुळे हृदयविकाराचा झटका आल्याने १४ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.


उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये रात्री आणि सकाळी थंडी आणि दाट धुके पडत आहे. पुढील तीन दिवसांत उत्तराखंड, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम आणि त्रिपुरामध्ये दाट धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज राजस्थान, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागंन वर्तवली आहे. याशिवाय उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागात आणि पंजाब, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड आणि ओडिशाच्या विविध भागात पुढील दोन ते तीन दिवस थंडीची लाट राहील. ९ जानेवारीला म्हणजे उद्या राजस्थान, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीत थंडीची लाट राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

देशाची राजधानी दिल्ली आज चांगलीच गारठली आहे. आज दिल्लीत थंडीची लाट आणि धुक्याची चादर पसरली आहे. हवामान विभागाने आज दिल्लीत थंडीच्या लाटेचा ‘ऑरेंज अलर्ट’ आणि धुक्याचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. किमान तापमान ३ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. तर कमाल तापमान १८ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!