MumbaiNewsUpdate : प्रसिद्ध गायक आणि गझलकार भूपिंदर सिंह यांचे निधन
मुंबई : हिंदी सिनेसृष्टीला अनेक अजरामर गीतांचा नजराणा दिलेले प्रसिद्ध गायक आणि गझलकार भूपिंदर सिंह यांचे आज निधन झाले. मृत्यूसमयी ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पत्नी मिताली सिंह यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होत होते. लघवीचा त्यांना गेल्या अनेक दिवसांपासून त्रास सुरू झाला होता. अखेर आज मुंबईमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संगीत प्रेमींमध्ये आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
क्रिटिकेअर एशिया हॉस्पिटलमध्ये दहा दिवसांपूर्वी आमच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.त्यांना आतड्याचा आजार होता. दरम्यान त्यांच्यावर उपचार चालू असतानाच त्यांना कोरोनाचीही बाधा झाली होती. सोमवारी सकाळी त्यांची प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रात्री ७:४५ वाजता त्यांचे निधन झाले. भूपिंदर सिंग यांच्या पश्चात पत्नी मिताली आणि मुलगा निहाल सिंग असा परिवार आहे.
गायक भूपिंदर सिंह यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९४० रोजी अमृतसर येथे झाला. वडील नत्था सिंह यांच्याकडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. बालपणापासूनच ते गिटार वाजवण्यात एक्सपर्ट होते. आपल्या कारकिर्दीची सुरुवात ऑल इंडिया रेडिओपासून केली आणि दिल्ली दूरदर्शन केंद्राशीही ते संबंधित होते. १९६२ मध्ये संगीतकार मदन मोहन यांनी त्यांना एका पार्टीत गिटार वाजवताना ऐकले आणि त्यांना मुंबईला बोलावले.
मदनमोहन यांनी त्यांना हकीकत चित्रपटातील “होके मजबूर तेरे दरसे ..” हे गाणे ऑफर केले, ज्यात त्यांनी मोहम्मद रफी, तलत महमूद आणि मन्ना डे यांच्यासोबत गाणे गायले. खय्यामने त्यांना आखरी खत चित्रपटातील “रुत जवान जवान” हे एकल गाणे दिले. त्यांच्या बेसच्या आवाजाने त्यांच्या गायकीला एक वेगळी धार मिळाली आणि ते हळूहळू यशाच्या शिखरावर चढत गेले. भूपिंदर यांचे अनेक स्वतंत्र संगीत अल्बमही प्रसिद्ध आहेत.बॉलिवूडत्यांनी एकाहून एक सरस हिट गाणी दिली आहेत. गझल गायक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. त्यांच्या पत्नी मिताली सिंह यादेखील प्रख्यात गायिका आहेत. पत्नी मिताली यांच्यासोबत त्यांनी गझल गायनाचे शेकडो कार्यक्रम केले आहेत.
भूपिंदर सिंह गाजलेली प्रसिद्ध गाणी
भूपिंदर सिंग यांनी मौसम, सत्ता पे सत्ता, आहिस्ता आहिस्ता, दूरियां आणि हकीकत अशा अनेक चित्रपटासाठी पार्श्वगायन केले होते. ‘मेरा रंग दे बसंती चोला’, ‘ये प्यार हमें किस मोड़ पे ले आय ’, ‘हुजूर इस कदर’, ‘एक अकेला इस शहर में’, ‘जिंदगी मिलके बिताएंगे’, ‘बिती ना बिताये रैना’ , चुरा लिया है तुमने जो दिल को, दम मारो दम, महबूबा-महबूबा, दिल ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन, नाम गुम जाएगा, करोगे याद तो, मीठे बोल बोले, किसी नजर को तेरा इंतजार, कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता… अशी अनेक गीतें आजही लोकप्रिय आहेत.