Shivsena Controversy : LateNightNewsUpdate : ठाकरे विरुद्ध शिंदे : आता लढाई लोकसभेत, मुख्यमंत्री दिल्लीत दाखल …
नवी दिल्ली : शिवसेनेचे बंडखोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या आक्रमक पवित्र्यात असले तरी या सर्व घडामोडींना अतिशय संयमाने घेत शिवसेना पक्ष प्रमुख बचावात्मक भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळेच आपले आमदार फुटल्यानंतर शिवसेनेच्या लोकसभेतल्या १८ खासदारांपैकी १२ खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती ठाकरे यांना असल्याने त्यांनी पक्षाच्या वतीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिले आहे. भाजपच्या बलाढ्य पाठिंब्याच्या बळावर महाराष्ट्राच्या विधानसभेतील संख्याबळाची लढाई जिंकल्यानंतर आता डझनभर खासदारांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले आहेत.
Maharashtra CM Eknath Shinde arrives in Delhi. Visuals from Delhi airport pic.twitter.com/6xRmH1kLsI
— ANI (@ANI) July 18, 2022
या पत्रात आमचे गटनेते विनायक राऊत हे असून मूळ शिवसेना आमचीच आहे, असे सांगण्यात आले आहे. लोकसभा अध्यक्षांना हे पत्र देण्यासाठी विनायक राऊत, राजन विचारे, बंडू जाधव, अनिल देसाई आणि अरविंद सावंत गेले होते.
विनायक राऊत हे शिवसेनेचे गटनेते तर राजन विचारे हे प्रतोद आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या लोकसभा खासदारांना व्हीप बजावण्याचा तसंच लोकसभेत कोणाला मतदान करायचे , हे सांगण्याचा अधिकार विचारे यांना आहे. तुमच्याकडे जर कोणी खासदार गटनेता किंवा प्रतोद म्हणून पत्र घेऊन आला तर त्या पत्रावर कोणतीही कार्यवाही करू नका. आमच्या खासदारांपैकी कोणी असे पत्र घेऊन आले , तर मला माहिती द्या, अशी विनंती विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
दरम्यान खासदारांच्या फाटाफुटीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. शिंदे गटासोबत येणाऱ्या खासदारांना घेऊन शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटतील असेही सांगण्यात येत आहे. तसेच शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे हे या गटाचे प्रतोद असतील, असे पत्र घेऊन शिवसेनेचे बंडखोर खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना उद्या भेटणार असल्याचे समजल्यानेच उद्धव ठाकरे यांच्यावतीने आजच वरीलप्रमाणे माहिती देऊन विनंती करणारे पत्र देण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सोबतचे खासदार
शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी एक बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे लोकसभेचे ५ आणि राज्यसभेचे ३ खासदार उपस्थित होते. यामध्ये विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे, बंडू जाधव, ओमराजे निंबाळकर हे पाच लोकसभेचे खासदार तर संजय राऊत, अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी या राज्यसभेच्या खासदारांचा समावेश होता. गजानन किर्तीकर हे दिल्लीत नाहीत, पण ते आमच्यासोबत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.
शिंदे गटासोबत गेलेले चर्चेतील खासदार
दरम्यान मुख्यमंत्री शिंदे गटाच्या बैठकीला शिवसेनेचे १२ खासदार ऑनलाईन उपस्थित होते असे सांगण्यात येत आहे. यामध्ये सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, राजेंद्र गावित, संजय मंडलिक, श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव, धैर्यशील माने, कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांचा समावेश होता.