ShivsenaControversyNewsUpdate : चर्चेतली बातमी : शिंदे गटाची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी पाहा तर खरं…
मुंबई : मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्या गटालाच अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता मिळावी यासाठी युद्ध पातळीवरून प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून शिंदे यांनी आपल्या अधिकारात शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करत नवी राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित केली असल्याचे वृत्त आहे. परंतु हे सर्व करीत असताना शिंदे यांनी स्वतःकडे “मुख्य नेता ” हे पद घेऊन शिवसेना “पक्षप्रमुख” म्हणून उद्धव ठाकरे यांचेच नाव ठेवले असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान शिंदे गटाकडून घोषित करण्यात आलेल्या या कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांना शिवसेना मुख्यनेते म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर दिपक केसरकर यांची प्रवक्ते म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच तानाजी सावंत, विजय नहाटा, यशवंत जाधव, गुलाबराव पाटील यांची शिवसेना उपनेते म्हणून तर आज शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे गटाकडून घोषित करण्यात आलेल्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीत पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांचेच नाव कायम ठेवण्यात आले आहे. या पदाबाबत तसा कोणताही प्रस्ताव नव्हता, असे शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार देखील फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. हि चर्चाचालू असतानाच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी सेनेच्या खासदारांकडून करण्यात आली होती. याबाबत शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी एक पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले होते विशेष म्हणजे यावरून पुन्हा खासदारांची नाराजी नको म्हणून भाजप विरोधी आघाडीत असतानाही उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना ” आदिवासी समाजातल्या उमेदवार असल्याचे कारण देत पाठिंबा दिला. त्यानुसार आज राष्ट्रपतीपदासाठीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पण या मतदानानंतर शिवसेनेच्या १२ खासदारांनी शिंदे गटाच्या बैठकीला हजेरी लावणे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मनाला जात आहे.