MumbaiNewsUpdate : पत्राचाळ घोटाळा: संजय राऊतांची ९ तासांपासून ईडीकडून चौकशी
मुंबई : गेल्या ९ तासांपासून मुंबईच्या गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांची मागील ९ तासांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. आज दुपारी बारा वाजता ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले होते. याप्रकरणी ते पहिल्यांदाच चौकशीला सामोरे जात आहेत. त्यामुळे त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आणखी काही तास ही चौकशी सुरूच राहू शकते, असे सांगितले जात आहे.
या प्रकरणात दोन दिवसांपूर्वीच संजय राऊत ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता. मात्र, राज्यात चाललेल्या सत्तापालटाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी ईडीकडे वेळ मागितला होता. त्यानुसार संजय राऊतांना १ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार आज दुपारी १२ वाजता संजय राऊत ईडी कार्यालयात दाखल झाले होते. तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू आहे.
प्रकरण काय आहे?
मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि म्हाडाचा भूखंड आहे. ही चाळ विकसित करण्याचे काम प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. परंतु त्यांनी या चाळीचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला असल्याचा आरोप ईडीने केला आहे. पत्राचाळीत राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप प्रवीण राऊत यांच्यावर करण्यात आला आहे.
प्रवीण राऊत यांच्या कंपनीला पत्रा चाळीतील ३ हजार फ्लॅटचे काम देण्यात आले होते. त्यापैकी ६७२ फ्लॅट भाडेकरुंसाठी राखीव ठेवण्यात आले होते तर बाकीचे म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घेण्यात येणार होते. मात्र, २०११ ते २०१३ सालांमध्ये प्रवीण राऊत यांनी चाळीचे अनेक भाग खासगी बिल्डर्सना विकल्याचा आरोप करण्यात आला आहे.