DevendraFadanvisNewsUpdate : महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्ते अमित शाह यांच्यावर नाराज , बॅनरवरून फोटो गायब …
मुंबई : राज्यात सत्तांतरानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापन करताना ऐनवेळेवर भाजपचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डावलून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने भाजपाला येऊन मिळालेले शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले आहे. तसेच इच्छा नसतानाही राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविलेल्या देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री होण्यास भाग पाडले. यावरून मुंबईपासून ते नागपूरपर्यंत भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करणाऱ्या बॅनरवरून अमित शहा यांचा फोटो या कार्यकर्त्यांनी गायब केला आहे.
भाजप कार्यकर्त्यांनी दावा केला आहे कि , हे सरकार स्थापन करण्यासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाधिक परिश्रम घेतले त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पाडण्यात देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर भाजप सत्तेत आली तर भाजपचाच मुख्यमंत्री असेल आणि देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा कार्यकर्त्यांनाच अंदाज होता. पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेलेल्या निर्णयामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांची घोर निराशा झाली. त्यानंतर भाजप हायकमांडच्या आग्रहाखातर फडणवीस यांना राज्याच्या उपमुख्यमत्रिपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली.
कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न
दरम्यान या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांची समजूत काढताना भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही म्हणून नाराज होवू नका, असे आवाहन त्यांनी केले. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपच्या सर्व आमदारांची आज मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. “२०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागा. अडीच वर्षात सर्व रखडलेली कामे मार्गी लावू. कोणीही कसलीही काळजी करायचे कारण नाही. हे सरकार आपलं आहे. कुणीही नाराज होऊ नका. सर्वांनी आता जनतेसाठी काम करा”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अभिनंदनाच्या बॅनरवरून शहा यांचा फोटो गायब …
कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार या सर्व प्रकरणात अमित शहांचा हात असल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले, मात्र प्रत्यक्षात त्यांना उपमुख्यमंत्रिपदी नेमल्याने फडणवीस समर्थक नाराज झाल्याची चर्चा आहे. आज भाजपकडून मुंबई कार्यालयात जल्लोष करण्यात आला, पण या ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकांवरून अमित शहा गायब यांचा फोटो गायब असल्याचे दिसून आले. त्यानंतर नागपूरमध्येही माजी महापौर संदीप जोशी यांनी लावलेल्या फलकावरून अमित शाह गायब होते. कधी नव्हे ते अमित शाहांचा फोटो बॅनर करून गायब झाल्याने भाजपमधील नाराजी समोर आली आहे.
दाखवता येत नसले तरी देवेंद्र फडणवीस यांचीही नाराजी …
केंद्रीय नेतृत्वाचा आदेश आणि आज्ञा मानूण आपण उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले असे देवेंद्र फडणवीस सांगत असले तरी त्यांच्या एकूण देहबोलीवरून त्यांना मुख्यमंत्रिपदी पुन्हा विराजमान होता आले नाही म्हणून ते नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. परंतु या चर्चेकडे लक्ष न देता देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून कामावर लक्ष केंद्रित केले आहे.
काल शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्रिपदाचा कारभार स्वीकारला आणि त्यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. ओबीसी आरक्षणासाठी तातडीने कारवाई करावी. त्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व काही करावे , अशा प्रकारच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीला भाजप नेते प्रवीण दरेकर, संजय कुटे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते.