ShivsenaNewsUpdate : मोठी बातमी : अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पक्ष नेते पदावरून हकालपट्टी …
मुंबई : अखेर पक्षाविरोधात बंड करून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपद मिळविल्याबद्दल शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची पक्षनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केले. शिवसेनेचे ३९ आमदार त्यांच्यासोबत आहेत. यानंतर शिंदे गटाने पक्षावरच दावा सांगितला होता. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे यांच्याविरोधात काल ३० जून रोजीच मोठी कारवाई केली आहे.
दरम्यान पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप शिवसेनेने शिंदे यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतचे सरकार नको, भाजपसोबत चला अशी भूमिका घेत शिंदेंनी बंडखोरी केली. त्यांच्या बंडाला शिवसेनेच्या ३९ आमदारांनी साथ दिली. १० अपक्ष आमदारदेखील त्यांच्या पाठिशी उभे राहिले. शिंदे गट सरकारमधून बाहेर पडल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. आपल्याच माणसांनी दगा दिल्यामुळे आपण मुख्यमंत्रीपदाचा आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचाही त्याग करीत असल्याचे ठाकरे यांनी म्हटले होते.
खरी शिवसेना आमचीच , केला जात होता दावा …
गेल्या ९ दिवसांच्या राजकीय नाट्ट्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बहुमत चाचणीला सामोरे न जाताच ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदेंनी काल भाजपच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान शिवसेनेचे ५५ पैकी ३९ आमदार आपल्यासोबत असल्याने आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. तसेच शिंदे यांनी थेट शिवसेनेवरच दावा सांगितल्याने उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे विधिमंडळातील खरी शिवसेना कोणती असा प्रश्न शिंदेंच्या दाव्याने निर्माण झाला. हा तांत्रिक पेच कायम असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका शिंदे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
पक्षाच्या घटनेनुसार शिंदे यांच्यावर कारवाई …
शिवसेनेच्या घटनेत “शिवसेना प्रमुख” हे पद सर्वोच्च आहे आणि फक्त शिवसेना पक्षप्रमुखांनाच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संगनमताने कुणालाही पक्षातून काढण्याचा अधिकार आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, लिलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, संजय राऊत, गजानन किर्तीकर हे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या ठरावानुसार ९ जण पक्षनेते आहेत. यापैकी सुधीर जोशी यांचं निधन झालं आहे. तर, उद्धव ठाकरेंनी पक्ष प्रमुख या अधिकारात चार जणांची पक्षनेते म्हणून नियुक्ती केली होती. या चार जणांची नियुक्ती रद्द करण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. त्यामध्ये अनंत गीते, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ, एकनाथ शिंदे यांची नियुक्ती ठाकरेंनी केली आहे. आता पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत ठाकरेंनी शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदावरून हकालपट्टी केली आहे.