Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राजेश टोपे यांचा मोठा खुलासा

Spread the love

मुंबई: राज्यात ओमायक्रॉन आणि कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी पुन्हा लॉकडाऊन लावण्याची गरज नसल्याचे थेट उत्तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. मात्र गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी योग्य ते निर्णय घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला तर परिस्थिती नियंत्रणात राहण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.


दरम्यान प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी करण्यामुळे  टेस्टिंग विभागावर ताण पडेल. त्यामुळे राज्याची जेवढी क्षमता आहे, त्यानुसार रोज साधारण २ लाख चाचण्या व्हायलाच पाहिजेत. पण त्यावरही अँटिजेन टेस्ट करण्यावर भर द्यावा लागेल. अँटिजेन पॉझिटिव्ह आल्यानंतर पुन्हा आरटीपीसीआर करण्याची गरज नाही”, असेही  राजेश टोपे यांनी सांगितले

याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी टास्क फोर्स आणि आरोग्य खात्याची बैठक पार पडली. यावेळी राज्यातील कोरोना परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीत योग्य प्रकाराच्या मास्कचा वापर, आरोग्य यंत्रणेकडील मनुष्यबळ, प्रमाणित उपचार पध्दती, विलगीकरण कालावधी आदी विषयांवर कोविड टास्कफोर्सच्या टीमसोबत उपमुख्यमंत्र्यांनी विस्तृत चर्चा केली. दरम्यान कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला असल्याने परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे. इतर विभागांनी त्यांच्याशी समन्वयाने काम करावे, अशा सूचना यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

आरोग्य विभागाला अजित पवार यांच्या सूचना

राज्यातील कोरोना संसर्गाने बाधितांची संख्या वाढत आहे, ती आटोक्यात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देत चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी. सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांना गृहअलगीकरणात ठेवताना त्यांच्यावर आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून योग्य प्रकारे उपचार आणि देखरेख करण्यात यावी. कोरोनाची गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात बेडची उपलब्धता व्हावी, यासाठी कोविड रुग्णावर उपचारांसह देखभालीसाठी कोविड सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व कोविड रुग्णालये सज्ज ठेवण्यात यावीत. उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या अत्यावश्यक औषधांचा तुटवडा होऊ नये, त्याचा पुरवठा सुरळीत सुरु रहावा याची दक्षता घ्यावी. तसेच आरोग्य यंत्रणेत आवश्यक मनुष्यबळासंदर्भात आढावा घेऊन त्यासंदर्भात नियोजन करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

राज्यातील नवीन कोरोना विषाणू सद्यस्थिती व उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम कुमार गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तथा आरोग्य सेवेचे आयुक्त एन. रामास्वामी यांच्यासह व्हिसीव्दारे कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडीत, डॉ. अजित देसाई उपस्थित होते.

राज्यात तुर्तास लॉकडाऊनची गरज नाही : राजेश टोपे

राज्यातील कोरोनाच्या स्थितीविषयी माहिती देताना राजेश टोपे म्हणाले कि , राज्यात करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालायचा असेल तर गर्दी टाळलीच पाहिजे. यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर गोष्टी बंद करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. हे निर्बंध तात्काळ लागू होणार नाही. सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करुन निर्णय घेतला जाईल. पण राज्यात तुर्तास लॉकडाऊनची गरज नाही. टास्क फोर्सने  ‘ऑगमेंटेड रिस्ट्रीक्शन्स’ असा शब्द वापरला आहे. म्हणजे अशीच संख्या वाढत गेली, तर लॉकडाऊनसारखा १०० टक्के बंद करण्याची आज तरी गरज नाही. पण अनावश्यक गोष्टींवर दररोजची रुग्णसंख्या तपासून बंधनं आणता येतील का? याविषयीचा निर्णय घेतला जाईल. या विषाणूला रोखण्यासाठी गर्दी थांबवणे  गरजेचे  आहे. त्यानुसार गर्दी करणाऱ्या गोष्टींवर काही निर्बंध टाकण्यासाठी निर्णय घेतला जाईल. पण आजच त्यावर निर्बंध टाकले जातील, असे  नाही. मुख्यमंत्र्यांना त्यावर माहिती दिली असून त्या त्या वेळी त्याबाबत निर्णय घेतला जाईल.

राज्यातील ७० आमदार, १५ मंत्री कोरोनाने बाधित

दरम्यान मुंबईसह महाराष्ट्रात करोना प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे. ओमिक्रॉन विषाणूचा संसर्गही फैलावत आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी महाराष्ट्रातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. आता हा विळखा अधिक घट्ट होत चालला असून, महाराष्ट्रातील जवळपास ७० आमदार आणि १० ते १५ मंत्र्यांना करोनाचा संसर्ग झाला असल्याची माहितीही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये बूस्टर डोसची परवानगी

दरम्यान, खासगी रुग्णालयांनी त्यांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्याची परवानगी मागितली होती. स्वखर्चाने देखील हे आरोग्य कर्मचारी बूस्टर डोस घेतील, असं देखील या रुग्णालयांकडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता रुग्णालयांना त्यांच्या पातळीवर बूस्टर डोस घेण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!