Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : कोरोना झाला असेल तर घाबरू नका , अशी घ्या काळजी

Spread the love

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोना रुग्णांसाठी गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांसाठीच्या  मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला आहे. कोरोनची सौम्य लक्षणे असलेल्यांना किंवा नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह  रुग्णांना सुट्टी दिली जाईल, असे मार्गदर्शक सूचनांमधून सांगण्यात आले आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आणि किमान सात दिवस आणि सलग तीन दिवस ताप नसल्यास होम आयसोलेशन संपुष्टात येईल आणि रुग्णाला सोडण्यात येईल, असे मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. होम आयसोलेशन कालावधी संपल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही चाचणीची गरज नाही, असेही सूचनांमध्ये स्पष्ट केले आहे.


लक्षणे नसलेल्या अशा आहेत मार्गदर्शक सूचना

१. लॅब टेस्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या नागरिकांना होम आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. अशा रुग्णांच्या कुटुंबीयांना जिल्हा किंवा उपविभाग स्तरावरील नियंत्रण कक्षाचा क्रमांक देण्यात यावा जेणेकरून त्यांना रुग्णाच्या उपचारासाठी मार्गदर्शक सूचना मिळतील.

२. अशा रुग्णांच्या घरी आयसोलेशनची सोय असावी. याशिवाय घरात अशी व्यक्ती असावी ज्याने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत अशा व्यक्तींनी घरातील  रुग्णाची २४ तास काळजी घेणे आवश्यक आहे.

३. ६० वर्षांवरील अधिक वयाच्या रूग्णांवर (रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, फुफ्फुस, यकृत आणि किडनीचे रुग्ण) उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितल्यावरच त्या रुग्णांना होम आयसोलेशन केले जावे.

रुग्णांसाठी मार्गदर्शक सूचना

१. रुग्णांनी स्वत:ला घरातील इतर सदस्यांपासून दूर ठेवावे. एकाच खोलीत रहावे विशेषत: वृद्ध आणि आजारी असलेल्यांच्या संपर्कात कोणीही येऊ नये.

२. होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या रुग्णांनी हवेशीर खोल्यांमध्ये राहावे. ताजी हवा आत येण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवा. रुग्णाने भरपूर विश्रांती घ्यावी आणि भरपूर द्रवपदार्थ घ्यावेत.

३. रुग्णाने सतत साबणाने किंवा सॅनिटायझरने सतत हात धुवावे. याशिवाय शारीरिक हालचालींवर लक्ष ठेवावे.

४.  रुग्णांनी त्यांच्या वैयक्तिक वस्तू इतर कोणाशीही शेअर करू नये.

अशी करावी आपल्या आरोग्याची काळजी

दरम्यान अशा रुग्णांची काळजी घेताना तारीख आणि वेळेसह, शरीराचे तापमान, हृदय गती, ऑक्सिजन पातळी, तुम्हाला कसे वाटते (चांगले किंवा खूप वाईट) आणि श्वासोच्छवासाची स्थिती लिहून ठेवण्याची शिफारस केली आहे. तसेच रुग्णांची काळजी घेणाऱ्यांन ट्रिपल लेयर मास्क घालणे आवश्यक आहे. मास्कच्या पुढील भागाला हाताने स्पर्श करू नये. वापरल्यानंतर मास्कचे तुकडे करून आणि कागदाच्या पिशवीत ठेवून ते नष्ट केले पाहिजे. रुग्णांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या चेहऱ्याला आणि तोंडाला स्पर्श करणे टाळावे. अशांनी सतत हात स्वच्छ करत राहावेत.

काय उपचार कराल ?

अशा रुग्णांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सतत संपर्कात राहावे. कोणतीही अडचण आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसेच गंभीर आजार असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर त्यांची औषधे चालू ठेवावीत. या काळात रुग्ण टेलि कन्सल्टेशन प्लॅटफॉर्म वापरून त्यांचे उपचार सुरू करू शकतात, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!