OmicronMaharashtraUpdate : राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची ताजी स्थिती अशी आहे…

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात बुधवारी 85 नव्या ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईतील आहेत. बुधवारी मुंबईत ओमायक्रॉनच्या 53 रुग्णाची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 252 वर पोहचली आहे.
राज्यात बुधवारी आढळलेल्या 85 रुग्णापैकी 47 जणांचा रिपोर्ट एनआयव्ही आणि 38 जणांचा रिपोर्ट आयआयएसईआर या संस्थेने दिला आहे. एनआयव्हीने दिलेल्या रिपोर्ट्समधील 47 रुग्णापैकी 43 रुग्णांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे. तर चार रुग्ण संपर्कातील आहेत. यामध्ये मुंबईतील 34 रुग्णांचा समावेश आहे. नागपूर आणि पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी तीन-तीन रुग्णांची नोंद आहे. नवी मुंबई आणि पुणे शहरात प्रत्येकी दोन – दोन रुग्ण आढळले आहेत. तर पनवेल, कोल्हापूर आणि बुलढाणामध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. तर आयआयएसईआरने दिलेल्या रिपोर्ट्समधील 38 रुग्णापैकी 19 रुग्ण मुंबईतील आहेत. तर कल्याण डोंबिवलीमधील पाच रुग्णांचा समावेश आहे. नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी तीन रुग्णांचा समावेश आहे. तर वसई विरार आणि पुणे शहरातील प्रत्येकी दोन रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे ग्रामीण, भिवंडी, पनवेल आणि ठाण्यात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे.
राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णाची स्थिती अशी आहे
राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 252 इतकी झाली आहे. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 137 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, राज्यातील 252 रुग्णांपैकी 99 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. राज्यात आढळलेल्या 252 रुग्णांमध्ये 26 रुग्ण इतर राज्यातील आहेत, जे विदेशातून महाराष्ट्रात आले होते. 9 रुग्ण हे विदेशी नागरिक आहेत. राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ८७९ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १७६ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
मुंबई – 137 रुग्ण ,पिंपरी चिंचवड – 25 रुग्ण, पुणे ग्रामीण – 18 रुग्ण, पुणे शहर – 11 रुग्ण , ठाणे – 8 रुग्ण, नवी मुंबई – 7 रुग्ण, पनवेल – 7 रुग्ण, कल्याण डोंबिवली – 7 रुग्ण, नागपूर – 6 रुग्ण, सातारा – 5 रुग्ण, उस्मानाबाद – 5 रुग्ण, वसई विरार – 3 रुग्ण, औरंगाबाद – 2 रुग्ण, नांदेड – 2 रुग्ण, बुलढाणा – 2 रुग्ण, भिवंडी – 2 रुग्ण, लातूर – 1 रुग्ण, अहमदनगर – 1 रुग्ण, अकोला – 1 रुग्ण, मीरा भाईंदर- 1 रुग्ण आणि कोल्हापूर – 1 रुग्ण